World Test Championship (WTC) final India vs New Zealand : साऊदॅम्प्टन येथील जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा पहिला डाव 217 धावांवर गडगडला. 3 बाद 146 धावांवरून तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू करणाऱ्या टीम इंडियाचे 7 फलंदाज अवघ्या 71 धावांत न्यूझीलंडनं माघारी पाठवले. कायले जेमिन्सननं सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. भारतीय संघ अडचणीत सापडलेला दिसत असताना प्रमुख फिरकीपटू आर अश्विन ( R Ashwin) यानं त्याच्या निवृत्तीबाबत मोठी घोषणा केली.
प्रतिस्पर्धींमुळे मला सर्वोत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते असे अश्विननं सांगितले आणि स्वतःच्या खेळात सुधारणा करण्याची इच्छा जेव्हा गमावून बसेन, तेव्हा खेळणं सोडेन, असे अश्विननं सांगितले.तो म्हणाला, सतत सुधारणा करणे, याच दृष्टीकोनामुळे मी कारकिर्दीत यश मिळवल आहे. त्या बाबतीत कोणतीच तडजोड मी केली नाही. खेळात सुधारणा करत राहण्याचा माझा प्रयत्न सुरूच असतो. त्यामुळे नवीन काही करण्याची इच्छाच जेव्हा संपेल, तेव्हा मी खेळणं सोडून देईन.
34 वर्षीय गोलंदाजानं कसोटी क्रिकेटमध्ये 409 विकेट्स घेतले आहेत. त्याला कोणत्याच वादात अडकायला आवडत नाही, तो फक्त आपल्या कामगिरीवर लक्ष केंद्रीत करून खेळतो. तो म्हणाला, मला संघर्ष करायला मजा येते आणि याच कारणामुळे मी यश मिळवलं आहे.