महिला प्रीमियर लीगमधील पराभवाच्या हॅटट्रिकनंतर अखेर चौथ्या हंगामात गुजरात जाएंट्सच्या संघाने सलामीचा सामना जिंकला आहे. गुजरात जाएंट्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यातील सामना नवी मुंबईतील डी. वाय पाटील स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना गुजरातच्या संघाने WPL च्या इतिहासातील आपली सर्वोच्च धावसंख्या उभारत यूपी वॉरियर्स संघासमोर २०८ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना यूपीच्या संघाने चांगली टक्कर दिली. पण त्यांना २०० धावांच्या आत गुंडाळत गुजरात जाएंट्सच्या संघाने १० धावांनी सामना जिंकला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अनुष्का शर्माचा 'पायगुण'; गुजरात जाएंट्सची 'साडेसाती' संपली!
गुजरात जाएंट्स महिला संघाने २०२३ च्या पहिल्या हंगामापासून गत हंगामापर्यंत कधीच सलामीचा सामना जिंकला नव्हता. यंदाच्या हंगामात मध्य प्रदेशची युवा भारतीय बॅटर अनुष्का शर्मानं या संघाकडून पदार्पण केले. चौथ्या हंगामातील सलामीच्या लढतीत तिला पदार्पणाची संधी मिळाली अन् तिच्या संघातील एन्ट्रीसह गुजरातच्या संघाची WPL मधील सलामीच्या लढतीतील पराभवाची मालिका खंडीत झाली. अनुष्का शर्माच्या 'पायगुण' अन् GG ची 'साडेसाती' संपली असे चित्र या सामन्यात पाहायला मिळाले.
WPL 2026 Anushka Sharma Debut :विराट कोहलीला आयडॉल मानणाऱ्या अनुष्का शर्माची फिफ्टी हुकली, पण...
GG ची कॅप्टन अॅश्ले गार्डनरसह पदार्पणाच्या सामन्यात अनुष्का शर्माही चमकली
WPL च्या आतापर्यंतच्या हंगामात प्रत्येक फायनल खेळणारी कर्णधार यंदाच्या हंगामात दिल्लीच्या ताफ्यातून यूपीच्या संघात गेली आहे. तिला अपेक्षेनुसार या संघाची कॅप्टन्सीही मिळाली. गुजरातविरुद्धच्या लढतीत तिने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला हा निर्णय चांगलाच फसला. GG ची कर्णधार अॅश्ले गार्डनरचे अर्धशतक ६५ (४१), सोफी डिवाइन ३८ (२०), अनुष्का शर्मा ४४ (३०) आणि जॉर्जिया २७ (१०) यांनी केलेल्या उपयुक्त खेळीच्या जोरावर गुजरातच्या संघाने निर्धारित २० षटकात ४ विकेट्सच्या मोबदल्यात २०७ धावा केल्या होत्या.
फोबी लिचफिल्डची एकाकी झुंज
या धावांचा पाठलाग करताना यूपी संघाची सुरुवात खराब झाली. किरण नवगिरे अवघ्या एका धावेवर बाद झाल्यावर कर्णधार मेग लेनिंग आणि फोबी लिचफिल्ड जोडी जमली दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी रचली. पण मेग लेनिंगची विकेट पडल्यावर UP संघातील अन्य बॅटिंग लाईन कोलमडली. लिचफिल्डनं एकाकी झुंज देत ४० चेंडूत ७८ धावांची खेळी करत संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या, पण तिची विकेट पडली अन् गुजरातच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. गोलंदाजीत गुजरातकडून रेणुका सिंह ठाकूर, सोफी डिवाइन आणि जॉर्जिया यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. याशिवाय कर्णधार गार्डनर आणि राजेश्वरी गायकवाडने एक विकेट आपल्या खात्यात जमा केली.