Ayushi Soni Retired Out WPL 2026: वुमन्स प्रीमियर लीगच्या (WPL 2026) तिसऱ्या हंगामात मंगळवारी एक नवा इतिहास रचला गेला. गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यात गुजरातची फलंदाज आयुषी सोनी WPL च्या इतिहासात 'रिटायर्ड आऊट' (Retired Out) होणारी पहिली खेळाडू ठरली आहे. विशेष म्हणजे, आयुषीचा हा पदार्पणाचा (Debut) सामना होता.
नेमकी घटना काय?
नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरात जायंट्सने प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात केली होती. १०.१ षटकात संघाने ९७ धावा केल्या होत्या. त्यानंतर २५ वर्षीय आयुषी सोनी फलंदाजीला आली. संघ व्यवस्थापनाला तिच्याकडून फटकेबाजीची अपेक्षा होती, मात्र आयुषीला खेळपट्टीवर जम बसवण्यासाठी संघर्ष करावा लागला. तिने १४ चेंडूंचा सामना केला, परंतु तिला केवळ ११ धावाच करता आल्या. तिला एकही चौकार किंवा षटकार मारता आला नाही. अखेर संघाची रणनीती म्हणून तिला 'रिटायर्ड आऊट' करण्यात आली.
'रिटायर्ड आऊट' म्हणजे काय?
डावाची शेवटची ४-५ षटके शिल्लक असताना, धावांची गती वाढवण्यासाठी गुजरात जायंट्सने एक धाडसी निर्णय आखला. १६ व्या षटकाच्या अखेरीस संघ व्यवस्थापनाने आयुषीला मैदानाबाहेर बोलावले आणि तिला अधिकृतपणे 'रिटायर्ड आऊट' घोषित केले. क्रिकेटच्या नियमांनुसार, एखादा फलंदाज दुखापतीशिवाय केवळ रणनीती म्हणून मैदानाबाहेर गेला, तर त्याला पुन्हा फलंदाजीला येता येत नाही आणि त्याला 'रिटायर्ड आऊट' मानले जाते.
निर्णयाचा झाला फायदा
निर्णयाचा संघाला फायदा गुजरात जायंट्सला फायद्याचा ठरला. आयुषीच्या जागी आलेल्या भारती फूलमाली हिने मैदानावर येताच तुफान फटकेबाजी केली. तिने केवळ १५ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ३६ धावा कुटल्या. भारतीच्या या खेळीमुळे गुजरातला २० षटकात १९२ धावांचा डोंगर उभा करता आला.