Smriti Mandhana, WPL 2025 RCB vs DC : महिला प्रीमियर लीग २०२५ चा चौथा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला गेला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कर्णधार स्मृती मंधानाच्या दमदार खेळीमुळे एकतर्फी विजय मिळवला. दोन्ही संघांमधील हा सामना वडोदऱ्यातील कोटाम्बी स्टेडियमवर खेळवण्यात आला. या पराभवासह दिल्ली संघाला यंदाच्या हंगामातील पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. तर गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सलग दुसरा विजय नोंदवला.
दिल्लीचा संघ १४१ धावांवर सर्वबाद
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्मृती मंधानाचा हा निर्णय योग्य ठरला. रेणुका ठाकूरने सामन्याच्या पहिल्याच षटकात शेफाली वर्माला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर, दिल्लीने ७ व्या षटकात दुसरी विकेट गमावली आणि त्यानंतर कोणताही फलंदाज डाव सांभाळू शकला नाही. दिल्लीचा संघ फक्त १९.३ षटके खेळू शकला आणि १४१ धावा करून सर्वबाद झाला. यादरम्यान जेमिमा रॉड्रिग्जने सर्वाधिक ३४ धावा केल्या. तिच्याशिवाय इतर कोणताही खेळाडू तिशीचा टप्पा गाठू शकला नाही. रेणुका ठाकूर आणि जॉर्जिया वेअरहॅम या दोघींनी ३-३ विकेट्स घेतल्या. किम गार्थ, एकता बिश्त यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
स्मृती मंधानाचा धडाकेबाज खेळ
१४२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चांगली सुरुवात केली. स्मृती मंधाना आणि डॅनी व्हॅट यांच्यात एक शानदार सलामी भागीदारी झाली. दोघींनी १०.५ षटकांत १०७ धावांची सलामी दिली. डॅनीने ३३ चेंडूत ४२ धावांची खेळी केली. स्मृतीने फटकेबाजी सुरुच ठेवत २६ चेंडूत तुफानी अर्धशतक ठोकले. तिने १७२.३४ च्या स्ट्राईक रेटने ४७ चेंडूत ८१ धावा केल्या. या खेळीत तिने १० चौकार आणि तीन षटकार खेचले. आरसीबीने केवळ १६.२ षटकांत २ गडी गमावून लक्ष्य गाठले आणि पॉइंट्स टेबलमध्ये अव्वलस्थान कायम राखले.