Join us  

WPL 2024: कांटे की टक्कर! अखेर गुजरातनं उघडलं विजयाचं खातं; पण बसला मोठा झटका

GGW vs RCBW: महिला प्रीमिअर लीगमध्ये गुजरात जायंट्सच्या संघाने पहिला विजय मिळवला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2024 1:09 PM

Open in App

GG vs RCB WPL: सध्या महिला प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या हंगामाचा थरार रंगला आहे. यंदाच्या पर्वाला सुरुवात झाल्यापासून गुजरात जायंट्सचा संघ संघर्ष करत आहे. मात्र, बुधवारी झालेल्या सामन्यात गुजरातने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला नमवून स्पर्धेतील पहिला विजय मिळवला. दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर हा सामना खेळवला गेला. गुजरातकडून खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या लौरा वोल्वार्टने चमकदार कामगिरी करून स्मृतीच्या आरसीबीला पराभवाची धूळ चारली. गुजरातने पहिला विजय मिळवला. पण, संघाची स्टार खेळाडू हरलीन देओल यंदाच्या हंगामातून बाहेर झाली आहे. 

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना गुजरातकडून लौरा आणि कर्णधार बेथ मूनी यांनी स्फोटक खेळी केली. दोघींनी पहिल्या बळीसाठी ७८ चेंडूत १४० धावांची भागीदारी नोंदवली. लोराने ४५ चेंडूत ७६ धावा कुटल्या. तिने १३ चौकारांसह १६८ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. 

गुजरातचा पहिला विजय गुजरातच्या संघाने साखळी फेरीतील आपला पाचवा सामना आरसीबीविरूद्ध खेळला. सुरुवातीचे चारही सामने गमावल्यानंतर गुजरातने अखेर विजयाचे खाते उघडले. कर्णधार मूनीने ५१ चेंडूत ८५ धावांची शानदार खेळी केली. तिच्या खेळीत १२ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ५ बाद १९९ धावा केल्या. आरसीबीकडून सोफी आणि वरेहम यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले. 

२०० धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीच्या संघाला घाम फुटला. स्मृती मानधनाच्या नेतृत्वात आरसीबी २० षटकांत ८ बाद केवळ १८० धावा करू शकली आणि सामना १९ धावांनी गमावला. आरसीबीकडून जॉर्जिया वेयरहमने संघर्ष केला पण तिला इतर एकाही खेळाडूची साथ मिळाली नाही. तिने २१८ च्या स्ट्राईक रेटने २२ चेंडूत ४८ धावा केल्या. 

हरलीन स्पर्धेबाहेर दुखापतीमुळे हरलीन देओल महिला प्रीमिअर लीगच्या यंदाच्या पर्वातून बाहेर झाली आहे. तिच्या जागी भारती फूलमालीला संधी मिळाली. ती आरसीबीविरूद्धच्या सामन्याआधी सराव सत्रात दिसली होती. यूपी वॉरियर्सविरूद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना हरलीनच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. आरसीबीविरूद्धच्या सामन्यात ती गुजरातची प्रेक्षक म्हणून मैदानात दिसली.

टॅग्स :महिला प्रीमिअर लीगरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरस्मृती मानधना