Join us

भारताच्या 'पाकिस्तानी जावईबापू नंबर 4' चं टीम इंडियाला निमंत्रण; म्हणाला....

शोएब मलिकनंतर आणखी एक पाकिस्तानी क्रिकेटपटू हसन अली भारतीय मुलीशी विवाह करणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 13:40 IST

Open in App

लाहोर : शोएब मलिकनंतर आणखी एक पाकिस्तानी क्रिकेटपटू हसन अली भारतीय मुलीशी विवाह करणार आहे. हरयाणा येथील मेवात जिल्ह्यातील शामिया आरझूशी पाकिस्तानी गोलंदाज हसन अलीचा विवाह होणार आहे. दुबईतील अटलांटा पाल्म हॉटेलमध्ये 20 ऑगस्टला शामिया आणि हसन विवाहबंधनात अडकणार आहे. हसन अलीनं याबाबत सोशल मीडियावर दुजोराही दिला. हसनने आता या लग्नसोहळ्यासाठी टीम इंडियातील सदस्यांना निमंत्रण दिले आहे. 

तो म्हणाला,''मी लग्नाला भारतीय क्रिकेट संघाला निमंत्रित करतो. आपण सर्वच जण क्रिकेटपटूच आहोत. दुबईत होणाऱ्या या सोहळ्याला भारतीय संघातील खेळाडू आल्यास मला आनंदच होईल. स्पर्धा ही मैदानावर आहे, मैदानाबाहेर नाही. आपण सर्व व्यावसायिक क्रिकेटपटू आहोत आणि सर्वांनी एकत्र आनंद साजरा करायला हवा.''

शामिया एअर अमीरातमध्ये फ्लाईट इंजिनिअर आहे. तिनं हरयाणा येथील मानव रचना युनिव्हर्सिटीतून बी. टेच ( एरोनॉटीक) ची पदवी घेतली आहे. मागील तीन वर्षांपासून शामिया दुबईतच स्थायिक आहे. तिचे कुटुंबीय नवी दिल्लीत राहतात. शामियाचे वडील लियाकत अलीने सांगितले की, "मुलीचे लग्न तर करायचे आहे. मग मुलगा भारताचा असो किंवा पाकिस्तानचा, याचा काही फरक पडत नाही. फाळणीनंतर आमचे नातेवाईक पाकिस्तानात गेले होते व त्यांच्याशी आमचा आजही संपर्क आहे.''   

पाकिस्तानी क्रिकेटपटूशी विवाहबद्ध होणारी शामिया ही तिसरी भारतीय मुलगी आहे. यापूर्वी झाहीर अब्बास, मोहसीन खान, शोएब मलिक यांनी भारतीय महिलांशी विवाह केला आहे. 

वाघा बॉर्डरवर केली होती 'कार्टून'गिरीइंग्लंड आणि आयर्लंड दौ-यावर जाण्यापूर्वी पाकिस्तानी क्रिकेट संघाचा ट्रेनिंग कॅम्प सुरू होता. कॅम्पच्या शेवटच्या दिवशी संघाला वाघा बॉर्डरवर नेण्यात आलं होतं. वाघा बॉर्डरवर भारत आणि पाकिस्तानकडून परेड सुरू असतानाच अचानक हसन अलीनं विकेट घेण्याच्या अंदाजात भारतीय जवानांकडे पाहून हावभाव केले. बळी मिळवल्यानंतर जसा आनंद साजरा केला जातो, तसेच हावभाव तो भारतीय जवानांकडे पाहून करत होता. यानंतर  हसन अलीला भारतीयांनी असं संबोधलं होते.

हसननं वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानं चार सामन्यांत दोन विकेट्स घेतल्या होत्या, पण 38 षटकांत त्यानं 256 धावा दिल्या. हसननं आतापर्यंत 53 वन डे आणि नऊ कसोटी सामन्यांत एकूण 88 विकेट्स घेतल्या आहेत. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 30 सामन्यांत 35 विकेट्स आहेत.

टॅग्स :पाकिस्तानभारतीय क्रिकेट संघशोएब मलिक