ICC Women's ODI World Cup: २०२५ च्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका आमने-सामने आले असून नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्टेडियमध्ये हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात, टीम इंडियाने १६६ धावांवर दोन विकेट गमावल्यानंतर हरमनप्रीत कौर फलंदाजीला आली. तिच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. परंतु, ती २९ चेंडूत केवळ २० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. या छोट्या खेळीसह, हरमनप्रीत कौरने एका मोठ्या विश्वविक्रमावर नाव कोरले. ती आता आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात नॉकआउट सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू बनली आहे. या विक्रमासह हरमनप्रीतने माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार बेलिंडा क्लार्क हिला मागे टाकले आहे. बेलिंडाने ६ डावांमध्ये ३३० धावा केल्या होत्या, तर हरमनप्रीतने केवळ चार डावांमध्येच ३३१ धावा करण्याचा पराक्रम केला.
कर्णधार हरमनप्रीत कौरने मोठा विक्रम आपल्या नावावर नोंदवला असला तरी, तिची या २०२५ च्या विश्वचषकातील फलंदाजीची एकूण कामगिरी अपेक्षेनुसार झाली नाही. नऊ सामन्यांमधील आठ डावांमध्ये तिने एकूण २६० धावा केल्या, ज्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे.