हार्दिक पांड्याशिवाय संघाची हवा; १२० चेंडूत ३४९ धावांसह नवा वर्ल्ड रेकॉर्ड सेट केला ना भावा!

अन् पांड्या बंधूंच्या संघानं उभारली टी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 13:25 IST2024-12-05T13:22:54+5:302024-12-05T13:25:22+5:30

whatsapp join usJoin us
World Record Baroda smash highest-ever T20 total of 349 Runs does it without Hardik Pandya | हार्दिक पांड्याशिवाय संघाची हवा; १२० चेंडूत ३४९ धावांसह नवा वर्ल्ड रेकॉर्ड सेट केला ना भावा!

हार्दिक पांड्याशिवाय संघाची हवा; १२० चेंडूत ३४९ धावांसह नवा वर्ल्ड रेकॉर्ड सेट केला ना भावा!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

World Record Baroda smash highest-ever T20 total of 349 Runs : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या देशांतर्गत टी-२० स्पर्धेत क्रुणाल पांड्याच्या नेतृत्वाखालील बडोदा संघाने वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या या संघाने उभारली. विशेष म्हणजे हार्दिक पांड्या संघात नसताना सिक्कीम संघा विरुद्ध बडोदा संघाने निर्धारित २० षटकात ५ विकेट्सच्या मोबदल्यात ३४९ धावा कुटल्या. ही टी-२० क्रिकेटमधील  सर्वोच्च धावसंख्या आहे.

झिम्बाब्वेच्या वर्ल्ड रेकॉर्डला लागला सुरुंग

याआधी  टी २० क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम हा झिम्बाब्वे संघाच्या नावे होता. यावर्षी ऑक्टोबरमध्ये गाम्बिया विरुद्धच्या सामन्यात झिम्बाब्वेच्या संघानं ४ विकेट्सच्या मोबदल्यात ३४४ धावा केल्या होत्या. हा विक्रम मोडीत काढत बडोदा संघाने टी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येचा विश्व विक्रम आपल्या नावे केला आहे.

टी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येचा रेकॉर्ड

५ बाद ३४९ धावा - बडोदा विरुद्ध सिक्कीम, २०२४
४ बाद ३४४ धावा- झिम्बाब्वे विरुद्ध गाम्बिया, २०२४
३ बाद ३१४ धावा- नेपाळ विरुद्ध मंगोलिया, २०२३
६ बाद २९७ धावा- भारत विरुद्ध बांगलादेश, २०२४
३ बाद २८७ धावा- सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध बंगळुरु, २०२४

भानू पानियाची  ५१ चेंडूत नाबाद १३४ धावांची खेळी

सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतील सिक्कीम विरुद्धच्या लढतीत नाणेफेक जिंकून क्रणाल पांड्यानं पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या काही सामन्यात  हार्दिक पांड्याही या संघाकडून तुफान फटकेबाजी करताना पाहायला मिळाले. पण सिक्कीम विरुद्धच्या लढतीत बडोदा संघ हार्दिक पांड्याशिवाय मैदानात उतरला होता.  भानू पानियानं  ५१ चेंडूत नाबाद १३४ धावांची खेळी करत  वर्ल्ड रेकॉर्ड सेट करण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याने आपल्या खेळीत १५ उत्तुंग षटकार आणि ५ चौकार मारले. त्याच्याशिवाय बडोदा संघाच्या ताफ्यातील शिवालिक शर्मा (५५)*, अभिमन्यू सिंह (५३) विकेटकीपर बॅटर विष्णू सोळंकी (५०) यांनी अर्धशतके झळकावली. 

टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येचा पाठलाग करताना सिक्कीमच्या संघाला निर्धारित २० षटकात ७ गड्यांच्या मोबदल्यात फक्त ८६ धावांपर्यंत मजल मारता आली. बडोदा संघाने २६३ धावांसह हा सामना खिशात घातला.

Web Title: World Record Baroda smash highest-ever T20 total of 349 Runs does it without Hardik Pandya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.