लंडन : कर्णधार दिमुथ करुणारत्ने (९७) आणि परेरा (५२) यांच्या अर्धशतकी खेळीनंतरही श्रीलंकेला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात ८७ धावांनी पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३३५ धावांचे आव्हान लंकेला पेलवले नाही. त्यांचा संपूर्ण संघ ४५.५ षटकांत २४७ धावांतच गुंडाळला. चांगल्या सुरुवातीनंतरही मधल्या फळीतल्या फलंदाजांच्या हाराकिरीमुळे श्रीलंकेचा पराभव झाला.
करुणरत्ने आणि परेरा यांनी पहिल्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी केली. स्टार्कने परेराचा अडथळा दूर केला. यानंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर श्रीलंकन फलंदाजांनी गुडघे ठेकले. ९७ धावा काढून करुणरत्ने रिचर्डसनच्या गोलंदाजीवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने ४, केन रिचर्डसनने ३ तर पॅट कमिन्सने दोन बळी घेतले.
तत्पुर्वी कर्णधार अॅरॉन फिंच याने केलेल्या १५३ धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत सात बाद ३३४ धावा केल्या. फिंच याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्येची बरोबरी केली. १३२ चेंडूंच्या खेळीत फिंच याने १५ चौकार आणि पाच षटकार लगावले. एकदिवसीय क्रिकेटमधील हे त्याचे १४वे आणि विश्वचषकातील दुसरे शतक आहे. स्टिव्ह स्मिथ याने त्याला चांगली साथ दिली. त्याने ५९ चेंडूंत ७३ धावा केल्या. दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी १७३ धावा करीत ऑस्ट्रेलियाला मजबूत धावसंख्या उभी करून दिली. वॉर्नरला धनंजय डिसिल्वाने २६ धावांवर तंबूत परत पाठविले. फिंच बाद झाल्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने नाबाद ४६ धावांची आक्रमक खेळी केली. श्रीलंकेकडून उदाना, धनंजय डिसिल्वा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
धावफलक :
आॅस्ट्रेलिया : ५० षटकांत ७ बाद ३३४; डेव्हिड वॉर्नर २६, अॅरॉन फिंच १५३, स्टीव्ह स्मिथ ७३, ग्लेन मॅक्सवेल नाबाद ४६, अॅलेक्स कॅरी धावचित (उदाना) ४ ; मलिंगा १/६१ उदाना २/५७, डि सिल्वा २/४०. श्रीलंका : ४५.५ षटकांत सर्व बाद २४७; करुणारत्ने ९७, कुशल परेरा ५२, लाहिरू थिरुमने १६, मेंडिस ३०,धनंजय डिसिल्व्हा नाबाद १६; मिशेल स्टार्क ४/५५, पॅट कमिन्स २/३८, रिचर्डसन ३/४७.