Join us

World Cup 2011च्या विजयाचं श्रेय MS Dhoni ला दिलं म्हणून भडकला गौतम गंभीर , म्हणाला...

02 एप्रिल 2011 ही भारतीय क्रिकेट इतिहासातील अत्यंत महत्त्वाची तारीख...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 10:20 IST

Open in App

02 एप्रिल 2011 ही भारतीय क्रिकेट इतिहासातील अत्यंत महत्त्वाची तारीख... वानखेडे स्टेडियमवरील त्या सामन्यानं कोट्यवधी भारतीयांना आनंद साजरा करण्याची संधी दिली. कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या त्या षटकारानंतर भारतातील प्रत्येक जण आनंदाने नाचला होता... भारतीय संघानं तब्बत 28 वर्षांनंतर वन डे वर्ल्ड कप उंचावला तो याच दिवशी. पण, या वर्ल्ड कप विजयाचे श्रेय केवळ धोनीला दिलं गेलं.

श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात टीम इंडिया संकटात असताना सलामीवीर गौतम गंभीर खेळपट्टीवर नांगर रोवून उभा राहिला आणि भारताच्या विजयाचा पाया रचला गेला. या ऐतिहासिक दिवसाच्या आठवणींना उजाळा देताना एका वेबसाईटनं महेंद्रसिंग धोनीचा षटकार मारलेला फोटो वापरला आणि त्यावरून गौतम गंभीर नाराज झालेला पाहायला मिळाला. 

श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि महेला जयवर्धनेच्या नाबाद 103 धावांच्या दमदार शतकाच्या जोरावर त्यांनी 6 बाद 274 धावांची आव्हानात्मक मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. वीरेंद्र सेहवाग भोपळाही न फोडता माघारी परतला, तर सचिन तेंडुलकर केवळ 18 धावांवर परतला. यामुळे भारताचा डाव 2 बाद 31 धावा असा अडचणीत आला होता. मात्र विराट कोहली (35) आणि गौतम गंभीर (97) या दिल्लीकरांनी भारताचा डाव केवळ सावरलाच नाही, तर या विश्वविजयाचा पायाही रचला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 83 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.  ही जोडी माघारी परतल्यानंतर महेंद्रसिंग धोनीनं ( 91) युवराज सिंगला (21) सोबत घेऊन भारताचा विजय पक्का केला. 

या आठवणीला उजाळा देताना एका वेबसाईटनं महेंद्रसिंग धोनीचा विजयी षटकाराचा फोटो वापरला. त्यावरून गौतम गंभीरनं त्यांना सुनावलं. त्यानं ट्विट केलं की,''2011चा वर्ल्ड कप हा संपूर्ण देशानं, संपूर्ण इंडियन टीमनं आणि सर्व सपोर्ट स्टाफमुळे जिंकला.''

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीगौतम गंभीर