Smriti Mandhana ICC Player of the Month: भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना हिने सप्टेंबर २०२५ साठीचा प्रतिष्ठित 'आयसीसी महिला प्लेअर ऑफ द मंथ' पुरस्कार जिंकला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच याची अधिकृत घोषणा केली. एकदिवसीय स्वरूपात केलेल्या तिच्या धमाकेदार फलंदाजीमुळे तिला हा विशेष सन्मान मिळाला आहे. मानधनाने तिच्या कारकिर्दीत दुसऱ्यांदा हा आयसीसी पुरस्कार पटकावला आहे. यापूर्वी, तिने जून २०२४ मध्ये हा पुरस्कार जिंकला होता.
मानधनाची सप्टेंबर महिन्यातील प्रभावी आकडेवारी
सप्टेंबर २०२५ मध्ये स्मृती मानधनाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये अभूतपूर्व कामगिरी केली. मानधनाने खेळलेल्या चार सामन्यांमध्ये ७७ च्या सरासरीने आणि १३५.६८ स्ट्राइक रेटने एकूण ३०८ धावा केल्या, यात दोन शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे.
पुरस्कार जिंकल्यानंतर मानधना काय म्हणाली?
सप्टेंबर २०२५ च्या या पुरस्कारासाठी पाकिस्तानची खेळाडू सिद्रा अमीन आणि दक्षिण आफ्रिकेची ताजमिन ब्रिट्स यांनाही नामांकन मिळाले होते. मात्र, मानधनाने या दोघींना मागे टाकून विजेतेपद मिळवले. पुरस्कार जिंकल्यानंतर आपला आनंद व्यक्त करताना मानधना म्हणाली की, "हा पुरस्कार जिंकल्याने मला खूप आनंद झाला आहे. जेव्हा खेळाडूला अशा प्रकारे प्रोत्साहन मिळते, तेव्हा ती आणखी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करते."