Women's T20 Challenge : महिला ट्वेंटी-२० चॅलेंज लीगच्या सलामीच्या लढतीत हरमनप्रीत कौरच्या सुपरनोव्हा संघाने विजयाच्या दिशेने कूच केली आहे. १६४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्मृती मानधनाच्या ( Smriti Mandhana  ) ट्रेलब्लेझर संघाची अवस्था ७ बाद ७३ अशी झाली आहे. ६३ धावांपर्यंत एकच विकेट गमावणाऱ्या ट्रेलब्लेझर्सने पुढील १० धावांत सहा विकेट्स गमावल्या. पूजा वस्त्राकरच्या उल्लेखनीय गोलंदाजीवर प्रिया पुनियाने ( Priya Punia) दोन अफलातून झेल घेत सामनाच फिरवला. 
प्रिया पुनिया आणि डिएंड्रा डॉटीन ( Deandra Dottin) यांनी सुपरनोव्हाला दणदणीत सुरुवात करून देताना ४.५ षटकांत ५० धावा फलकावर चढवल्या. डॉटीनने १७ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ३७ धावा केल्या. हायली मॅथ्यूजने ८व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर प्रिया पुनियाचा त्रिफळा उडवला. तिने २० चेंडूंत २२ धावा केल्या.  हर्लीन देओल व कर्णधार हरमनप्रीत कौर यांची २५ चेंडूंवरील ३७ धावांची भागीदारी सलमा खातूनने संपुष्टात आणली. हर्लीन १९ चेंडूंत ५  चौकारांसह ३५ धावा करून LBW झाली. पूजा वस्त्राकर १४ धावा करून माघारी परतला. त्याच षटकात हरमनप्रीत रन आऊट झाली. तिने २९ चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीने ३७ धावा केल्या.  सुपरनोव्हाचे ५ फलंदाज अवघ्या ९ चेंडूंत माघारी परतले. मॅथ्यूने २९ धावांत ३ विकेट्स घेतल्या. सुपरनोव्हाने सर्वबाद १६३ धावा केल्या.  
कर्णधार स्मृती मानधाना व हायली मॅथ्यूज यांनी प्रत्युत्तरात ३९ धावांची भागीदारी केली. पूजा वस्त्राकारने मात्र ट्रेलब्रेझरच्या तीन खेळाडूंना माघारी पाठवले. मॅथ्यूज १८, स्मृती ३४ ( २३ चेंडू) व सोफी डंक्ली ( १) या तिघींना पूजाने बाद केले. त्यानंतर एलाना किंगने ९व्या षटकात शर्मिन अख्तरेची ( ०) विकेट घेत सुपरनोव्हाचा विजय जवळपास पक्का केला. जेमिमा रॉ़ड्रीग्जवर आता ट्रेलब्लेझरच्या सर्व आशा होत्या. ११व्या षटकात रिचा घोष (२) कट मारण्याच्या प्रयत्नात डॉटीनच्या हाती झेल देऊन माघारी परतली. ट्रेलब्लेझरचा निम्मा संघ ७२ धावांवर माघारी परतला होता. सोफी एक्लेस्टोनच्या पुढच्याच चेंडूवर अरुंधती रेड्डी विचित्र प्रकारे रनआऊट झाली. तिने मारलेला चेंडू तिच्याच पायाला लागून यष्टिरक्षक तानिया भाटियाकडे गेला आणि तिने चपळाईने रन आऊट केले.