Join us  

झटपट क्रिकेटमध्ये विंडिज धोकादायक; रोहितचा फॉर्म, नेतृत्व आणि तंदुरुस्ती यशाची त्रिसूत्री ठरेल 

या मालिकेत यजमान संघात बुमराह, शमी आणि जडेजा नाही. लोकेश राहुल पहिल्या सामन्यात नसेल. त्यामुळे मैदानात उतरणारा भारताचा सर्वोत्कृष्ट संघ नसेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2022 1:45 PM

Open in App

अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर -वेस्ट इंडीज संघ येथे वन डे आणि टी-२० मालिकेसाठी दाखल झाला. पुढील आठवड्यात आयपीएलचा मेगा लिलाव होणार आहे. याशिवाय १९ वर्षांखालील विश्वचषकात भारताची अंतिम फेरीत धडक अशा ठळक घडामोडी क्रिकेट विश्वात घडल्या. आयपीएलची लोकप्रियता पाहता लिलावात चाहत्यांना अधिक उत्सुकता असेल. कोणते खेळाडू किती किमतीत विकले जातील याकडे त्यांचे लक्ष राहील. ते अपेक्षितही आहे. २००८ पासून लीगची लोकप्रियता उंचावत गेली. लखनौ आणि अहमदाबाद हे नवे दोन संघ वाढल्यामुळे उत्साह द्विगुणित झाला आहे. खेळाडूंच्या लिलावासाठी संघांना रक्कम वाढवून देण्यात आली. त्यांनी काही खेळाडू आधीच रिटेन केले. काही स्टार्सना स्वत:कडे ओढण्यासाठी फ्रँचायझी सरसावल्या आहेत. युवा प्रतिभांचे श्रेय बीसीसीआयला १९ वर्षांखालील विश्वचषकाबाबत बोलायचे, तर बाद फेरीपासून या स्पर्धेने अधिक लक्ष वेधले. भारतीय कर्णधार यश धूल आणि उपकर्णधार शेख रफिक यांच्यासह अनेक खेळाडूंना कोरोनाचा फटका बसला.

तरीही भारताने बांगलादेशला उपांत्यपूर्व आणि ऑस्ट्रेलियाला उपांत्य सामन्यात धूळ चारून भारताने अंतिम फेरी गाठलीच. मी इंग्लंडविरुद्ध अंतिम सामन्याआधी लेख लिहीत असल्याने निकाल काय लागेल, माहिती नाही. भारताने प्रतिकूल परिस्थितीत पुन्हा एकदा फायनलचा मार्ग प्रशस्त केला. यामुळे युवा क्रिकेटमधील प्रतिभा किती खोलवर रुजली याची साक्ष पटते. याचे श्रेय बीसीसीआयला द्यावे लागेल. अव्वल दर्जाच्या पायाभूत सुविधा, प्रतिभा शोध आणि प्रशिक्षणाशिवाय उत्कृष्ट संघ बांधणी शक्य नाही. विंडीजविरुद्ध विजय सोपे नाहीत आयपीएल लिलाव आणि १९ वर्षांखालील यश या गोष्टींनी लक्ष वेधले असताना वेस्ट इंडिजविरुद्ध वन-डे आणि टी-२० मालिकादेखील महत्त्वपूर्ण असेल. दक्षिण आफ्रिकेत याच भारतीय संघाने दारुण पराभव पत्करला.

त्यामुळे भारतीय क्रिकेट जलद सुधारण्याच्या स्थितीत आहे की अजूनही अशांततेत गुंतले आहे, याचा वेध विंडीजविरुद्ध मालिकेतील निकालावरून घेता येणार आहे. भारत घरच्या मैदानावर खेळत असेलही; पण मालिका सोपी नाही. कसोटीत विंडीज संघ माघारतो; पण झटपट प्रकार आणि त्यातही टी-२० त ते बलाढ्य ठरतात. भारतासारखाच विंडीज संघ काही महिन्यांआधी टी-२० विश्वचषकात ढेपाळला होता; पण हे विसरू नये की त्यांनी दोनदा विश्वचषक जिंकला. भारताकडे रवाना होण्याआधी अव्वल स्थानी असलेल्या इंग्लंडचा ३-२ असा पराभव केला. वन-डेत विंडीजचा रेकॉर्ड चांगला नसेलही; पण पांढऱ्या चेंडूने ते जिथे खेळतात, तेथे धोकादायक वाटतात, यात शंका नको. ख्रिस गेल आणि डे्वेन ब्राव्हो निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना संघात कर्णधार किरोन न पोलार्ड, जेसन होल्डर, शिमरॉन हेटमेयर, रोवन पॉवेल, निकोलस पूरन, अकील हुसेन हे अतिशय प्रभावशाली खेळाडू सामना फिरविण्यास सक्षम आहेत. आयपीएलमुळे विंडीजच्या खेळाडूंना भारतातील स्थितीत तसेच भारतीय खेळाडूंविरुद्ध खेळण्याचा भरपूर अनुभव आहे.

संघ बांधणीची भिस्त द्रविड - रोहित यांच्यावरच - या मालिकेत यजमान संघात बुमराह, शमी आणि जडेजा नाही. लोकेश राहुल पहिल्या सामन्यात नसेल. त्यामुळे मैदानात उतरणारा भारताचा सर्वोत्कृष्ट संघ नसेल. यामुळे ‘होम ॲडव्हांटेज’ कमी होतो. तथापि रोहितकडून फलंदाज आणि कर्णधार या नात्याने असलेल्या अपेक्षा मात्र कमी होत नाहीत. अलीकडे भारतीय नेतृत्व विलक्षण घडामोडी आणि वादात अडकले. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित यांच्या खांद्यावर जलद संघ बांधणीची जबाबदारी आहे. यंदा  टी-२० विश्वचषक तर २०२३ ला वन डे विश्वचषकाचे आयोजन होणार असल्याने ही वेळ फारच महत्त्वाची ठरणार आहे. रोहित हा गेल्या काही वर्षांत भारताचा प्रमुख फलंदाज राहिला. त्याच्या नेतृत्वाला उत्कृष्ट विश्वासार्हतादेखील लाभली. कोहलीच्या अनुपस्थितीत काळजीवाहू नेतृत्व तसेच मुंबई इंडियन्सचा यशस्वी कर्णधार अशी ओळख त्याने निर्माण केली. फिटनेसच्या समस्येमुळे द. आफ्रिका दाैऱ्यास मुकावे लागले होते. भारतीय संघ पुढील काही महिन्यात अनेक आव्हानांवर मात करण्यास सज्ज होत असताना रोहितचा फॉर्म, नेतृत्व आणि तंदुरुस्ती या गोष्टी संघाच्या यशाची त्रिसूत्री ठरणार आहेत. 

टॅग्स :अयाझ मेमनभारतीय क्रिकेट संघरोहित शर्माराहुल द्रविड
Open in App