- सौरव गांगुली लिहितात...
शुक्रवारपासून प्रारंभ होणाऱ्या दुस-या कसोटी सामन्यात बलाढ्य भारतीय संघाविरुद्ध विंडीज संघ आव्हान उभारण्यात कितपत यशस्वी ठरतो, याबाबत उत्सुकता आहे. मायदेशात यजमान संघ काही अपवाद वगळता नेहमीच वर्चस्व गाजवण्यात यशस्वी ठरला आहे. पण, अलीकडच्या कालावधीत अफगाणिस्तानचा अपवाद वगळता पहिल्या कसोटीत विंडीजने जशी शरणागती पत्करली तसे अन्य संघांबाबत म्हणता येणार नाही. पहिल्या कसोटीत विंडीज संघाकडून कुठलीच लढत मिळाली नाही. चांगल्या खेळपट्टीवर ही लढत केवळ तीन दिवसांमध्ये संपली. हैदराबादमध्ये कामगिरी सुधारणे म्हणजे विंडीज संघासाठी पर्वत चढण्याप्रमाणेच आहे.
पहिल्या कसोटी सामन्याचे ठळक आकर्षण म्हणजे पृथ्वी शॉ. युवा खेळाडूने लौकिकाला साजेशी कामगिरी केली. विविध पातळीवर शानदार कामगिरी करणा-या पृथ्वीने पदार्पणाच्या कसोटीतही कामगिरीत सातत्य राखले. पहिल्याच डावात त्याच्या खेळामध्ये वेगवेगळ्या शैली दिसून आल्या. भविष्यात त्याचे तंत्र आणखी सुधारले आणि तो मानसिकदृष्ट्याही कणखर होईल, अशी आशा आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कुठलाही खेळाडू १०० टक्के तयार होऊन येत नसतो. प्रत्येक डावात त्याच्या कामगिरीत सुधारणा होत जाते. पृथ्वी आॅस्ट्रेलियात यशस्वी ठरावा, अशा मी त्याला शुभेच्छा देतो. कारण उपखंडातील खेळाडूंची खरी परीक्षा ही विदेशात होते.
पृथ्वीने त्याचा कर्णधार विराट कोहली उपखंडात आणि विदेशात आपल्या डावाची कशी बांधणी करतो याकडे लक्ष द्यायला हवे. विराट हा असा खेळाडू आहे की, कुठलाही प्रतिस्पर्धी संघ मोठी खेळी करण्याची संधी सोडत नाही. पहिल्या कसोटी सामन्यात त्याने तेच केले. विराटची हीच मानसिकता विश्वक्रिकेटमध्ये त्याचे वेगळेपण अधोरेखित करणारी ठरते.
भारतीय गोलंदाजीचा विचार करता अश्विन, कुलदीप आणि जडेजा यांच्यासह वेगवान गोलंदाजांनी विंडीज संघावर वर्चस्व गाजवले.या पातळीवर विंडीज फलंदाजांची फटक्याची निवड सुमार दर्जाची होती. भारतीय संघ पाच फलंदाज व पाच गोलंदाज हीच रणनीती कायम राखणार आहे. मायदेशात खेळताना ही रणनीती योग्यच आहे.
महिनाभराच्या कालावधीनंतर आॅस्ट्रेलियात खेळायचे आहे, हे लक्षात ठेवूनच भारतीय संघाने रणनीती ठरवणे महत्त्वाचे आहे. आॅस्ट्रेलिया दौºयासाठी विराटची योजना तयार असेल. आॅस्ट्रेलियात कुणाला खेळवायचे हे त्याने नक्की केले असेल. परिस्थितीनुसार संघात कुठला बदल करायचा, हे सुद्धा त्याच्या डोक्यात फिट असेल. बहुप्रतिक्षित आॅस्ट्रेलिया दौरा विराटसाठी उपयुक्त ठरेल. (गेमप्लॅन)