टी-२० विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी केवळ मैदानावरील खेळाचीच नाही, तर खेळाडूंच्या हस्तांदोलनाची देखील मोठी चर्चा रंगली आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावरून भारताने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे, आजच्या सामन्यात भारतीय खेळाडू पाकिस्तानी खेळाडूंशी हात मिळवणार का? याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत दोन्ही संघांच्या कर्णधारांनी या संवेदनशील विषयावर सावध प्रतिक्रिया दिली. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याला हस्तांदोलनाबाबत विचारले असता, त्याने तुम्हाला सामन्याच्या दिवशी कळेलच, असे म्हणत सस्पेन्स कायम ठेवला. दुसरीकडे, पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा याने "मी यावर भाष्य करू शकत नाही, मैदानावर काय होईल ते पाहू," असे उत्तर दिले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतच्या संबंधांबाबत कठोर भूमिका घेतली. आशिया कप २०२५ मध्ये भारताने पाकिस्तानशी तीन सामने खेळले, मात्र एकाही सामन्यात भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नव्हते. भारताच्या या 'नो हॅण्डशेक' पॉलिसीमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कमालीचे नाराज झाले होते.
आयसीसीने पाकिस्तानची मागणी फेटाळली
मिळालेल्या माहितीनुसार, पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी हा मुद्दा आयसीसीकडे नेला होता. "भारत हस्तांदोलन करणार नसेल, तर आम्ही विश्वचषकातील सामने खेळणार नाही," अशी धमकीवजा भूमिका पाकिस्तानने घेतली होती. मात्र, आयसीसीने ही मागणी स्पष्टपणे फेटाळून लावली. "मैदानावरील हस्तांदोलन हे आयसीसीच्या अधिकारक्षेत्रात येत नाही, तो त्या-त्या राष्ट्रीय संघाचा वैयक्तिक निर्णय आहे," असे आयसीसीने ठणकावून सांगितले.
नियम काय सांगतो?
मेलबर्न क्रिकेट क्लबच्या 'स्पिरिट ऑफ क्रिकेट'मध्ये खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांशी नम्रतेने वागावे आणि हस्तांदोलन करावे, असे आवाहन केलेले आहे. मात्र, क्रिकेटच्या नियमावलीत असे करणे अनिवार्य किंवा सक्तीचे नाही. त्यामुळे भारताने आपले धोरण कायम ठेवल्यास आज कोलंबोमध्ये पुन्हा एकदा भारतीय खेळाडू पाकिस्तानशी हस्तांदोलन टाळण्याची दाट शक्यता आहे.