मुंबई : 14 फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. या हल्ल्याची जबाबदाली जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं स्वीकारली. या भ्याड हल्ल्यानंतर भारताने शेजारील राष्ट्राशी सर्व संबंध तोडून टाकावेत अशी मागणी जोर धरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दहशतवाद्यांना खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला तोडीसतोड उत्तर देण्याची भाषा केली आहे. तसेच पाकिस्तानसोबतचे सर्व आर्थिक व्यवहारही थांबवण्यात आले आहेत. क्रिकेटच्या मैदानावरही भारताने पाकविरुद्ध खेळू नये, अशी मागणी जोर धरत आहे. त्यामुळे आगामी वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत-पाक सामन्यावर अनिश्चिततेचं सावट आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) वर्ल्ड कप स्पर्धेतून पाकिस्तान संघावर बंदी घालावी अशी मागणी करणारे पत्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला ( आयसीसी) पाठवले होते. मात्र, आयसीसीनं ती मागणी फेटाळून लावली. पण, आता प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी पाकिस्तानला क्रिकेटच्या मैदानातही एकटं पाडण्याची मागणी केली आहे आणि त्यासाठी त्यांनी आयसीसीच्या अन्य संलग्न सदस्यांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. हा मुद्दा आयसीसीच्या कार्यकारी प्रमुखांकडे मांडणार असल्याचेही राय यांनी सांगितले.
ते म्हणाले,'' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानला एकटं पाडण्याची आमची मागणी आहे आणि त्यासाठी आम्हाला अन्य सदस्यांच्या सहकार्याची गरज आहे. तरच हे शक्य आहे. आयसीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यापुढे हा मुद्दा आम्ही मांडणार आहोत, परंतु यावर चर्चा करायची की नाही हे अध्यक्षच ठरवतील.''
राय यांनी यावेळी MPA (Member Participation Agreement) या कराराबद्दल क्रीडा मंत्रालयाशी चर्चा करणार असल्याचेही सांगितले. '' MPA संदर्भात आम्ही गृह मंत्रालय, क्रीडा मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालय यांच्याशी चर्चा करणार आहोत. या पत्रात आम्हाला निर्णय घेण्याची मुभा असल्याची स्पष्ट नोंद आहे. त्याबद्दल मला आताच काही सांगायचे नाही, परंतु आम्हाला योग्य वाटेल तो निर्णय आम्ही घेऊ शकतो.''
इंग्लंड येथे 30 मे ते 14 जुलै या कालावधीत वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 16 जूनला सामना होणार आहे.