अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबीने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र, आता तो आपला निर्णय बदलणार आहे. ४० वर्षांचा नबी हा अफगाणिस्तानच्या सर्वात अनुभवी अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. त्याने नुकतेच, आयसीसीशी बोलताना, निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नबीने यामागे एक विशेष कारण देखील सांगितले आहे.
आयसीसीशी बोलताना नबी म्हणाला, चॅम्पियन्स ट्रॉफीनंतरही आपली अफगाणिस्तानसाठी खेळण्याची इच्छा आहे. त्याची त्याचा १८ वर्षांचा मुलगा हसन ईसाखिलसोबत अफगाणिस्तानचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा आगे. हसन इसाखिल अफगाणिस्तानकडून अंडर-१९ विश्वचषकात खेळला आहे आणि राष्ट्रीय संघात स्थान मिळविण्यासाठी तो कठोर मेहनत करत आहे. मात्र, १९ वर्षांखालील विश्वचषकात हसनची कामगिरी फारशी विशेष नव्हती. ओपनर म्हणून खेळताना त्याला केवळ ४३ धावाच करता आल्या...
याशिवाय, नबीने आपला मुलगा हसनसोबत खेळण्याची मनातील इच्छाही व्यक्त केली आहे. नबी म्हणाला, "मुलासोबत देशासाठी खेळणे हे माझे स्वप्न आहे, मला आशा आहे की, ते नक्की पूर्ण होईल. तो खूप चांगले प्रयत्न करत आहे. तो अत्यंत मेहनती आहे आणि मी देखील त्याला प्रोत्साहित करत असतो.
मोहम्मद नबीची कामगिरी - मोहम्मद नबीने २००९ मध्ये अफगाणिस्तान संघात पदार्पण केले होते. त्याने त्याच्या पदार्पणाच्या सामन्यातच शानदार अर्धशतकी खेळी केली होती. नबीने आतापर्यंत अफगाणिस्तानसाठी एकूण ३ कसोटी, १७० एकदिवसीय आणि १३२ टी-२० सामने खेळले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये, त्याने ३३ धावा केल्या आहेत आणि ८ विकेट्स घेतल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याने ३६१८ धावा केल्या आहेत आणि १७२ विकेट्स घेतल्या आहेत. तर टी२० मध्ये त्याने २३३७ धावा केल्या आहेत आणि ९७ विकेट्स घेतल्या आहेत.