नवी दिल्ली - निवृत्त भारतीय खेळाडू परदेशातील लीगमध्ये खेळण्याचा मार्ग लवकरच मोकळा होऊ शकतो. यासंदर्भात बीसीसीआय ७ जुलैला शिखर परिषदेची  बैठक घेणार आहे. 
या बैठकीत भारताच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सहभागाबद्दल निर्णय होण्याची शक्यता असून, निवृत्त झालेल्या खेळाडूंना परदेशातील लीग स्पर्धा खेळण्याची परवानगी देण्याबाबतही  चर्चा होणार आहे. एका वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत ज्या प्रमुख  मुद्द्यांवर चर्चा आणि निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यात भारताच्या निवृत्त झालेल्या खेळाडूंना परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी देणे तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये  भारतीय  क्रिकेट संघांचा  सहभाग, आदी प्रमुख मुद्द्यांचा समावेश आहे.