बुमराहच्या नेतृत्वात मोहीम फत्ते करणार? इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीसाठी टीम इंडिया सज्ज

सलग दुसऱ्यांदा कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आलेल्या कर्णधार रोहित शर्माला संघाबाहेर जावे लागले. यानंतर इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या कसोटीसाठी भारताचे नेतृत्व वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर सोपविण्यात आले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 10:46 IST2022-07-01T10:46:05+5:302022-07-01T10:46:36+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Will Bumrah lead the campaign Team India ready for the fifth Test against England | बुमराहच्या नेतृत्वात मोहीम फत्ते करणार? इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीसाठी टीम इंडिया सज्ज

बुमराहच्या नेतृत्वात मोहीम फत्ते करणार? इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीसाठी टीम इंडिया सज्ज

बर्मिंगहॅम : एकीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात नेतृत्वबदल झाला असताना दुसरीकडे, इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीआधी भारतीय क्रिकेट संघातही नेतृत्वबदल झाला आहे. नवा कर्णधार जसप्रीत बुमराह याच्या नेतृत्वात भारतीय संघ शुक्रवारपासून गतवर्षी अर्धवट राहिलेली मोहीम फत्ते करण्याच्या निर्धाराने यजमान इंग्लंडविरुद्ध भिडणार आहे.

सलग दुसऱ्यांदा कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आलेल्या कर्णधार रोहित शर्माला संघाबाहेर जावे लागले. यानंतर इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या कसोटीसाठी भारताचे नेतृत्व वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर सोपविण्यात आले. भारतीय संघ या मालिकेत सध्या २-१ अशा आघाडीवर असून विजयासाठी हा सामना जिंकणे अथवा अनिर्णित राखण्याचे बुमराहच्या संघापुढे आव्हान आहे. त्याचवेळी, यजमान इंग्लंड संघ हा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडविण्याचा पूर्ण प्रयत्न करेल.

गेल्या वर्षी भारताने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली दमदार कामगिरी करताना मालिकेत आघाडी घेतली. मात्र, यानंतर संघात मोठे बदल झाले. कोहलीने कर्णधारपद सोडले. त्यानंतर रोहितकडे संघाची धुरा आली खरी, मात्र तो कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्याला संघाबाहेर जावे लागले. तसेच, उपकर्णधार लोकेश राहुल दुखापतीमुळे सध्या संघाबाहेर आहे. अशा परिस्थितीत संघाचे कर्णधारपद बुमराहकडे सोपविण्यात आले. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात तो ३६ वा कर्णधार ठरणार आहे.

सामन्याच्या तयारीबाबत म्हणायचे झाल्यास यजमानांची स्थिती भारताच्या तुलनेत वरचढ आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वीच कसोटी विश्वविजेत्या न्यूझीलंडला ३-० असे सहज नमवले. दुसरीकडे, भारताची तयारी पूर्णपणे झालेली दिसत नाही. त्यामुळे जबरदस्त लयीमध्ये असलेल्या इंग्लंडचा सामना करणे भारतीयांना सोपे जाणार नाही. इंग्लंडच्या फलंदाजांना रोखण्यासाठी मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांच्यावर मोठी जबाबदारी असेल.

फलंदाजांवर अधिक जबाबदारी
रोहित आणि राहुल या दोन प्रमुख फलंदाजांच्या अनुपस्थितीत भारताच्या फलंदाजांवर अधिक जबाबदारी आली आहे. विराट कोहली निश्चितच भारताच्या फलंदाजीचा आधारस्तंभ ठरणार आहे. पण, त्याच्यासोबत शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांना जबाबदारीने खेळावे लागेल. मधल्या फळीत श्रेयस अय्यरला संधी मिळण्याची शक्यता आहे. इंग्लिश कौंटी गाजवलेला पुजारा डावाची सुरुवात करू शकतो.

प्रतिस्पर्धी संघ :
भारत :
जसप्रीत बुमराह (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, रविचंद्रन अश्विन, प्रसिद्ध कृष्णा, श्रीकर भरत, मयंक अग्रवाल आणि उमेश यादव.
इंग्लंड : बेन स्टोक्स (कर्णधार), ॲलेक्स लीस, जॅक क्रॉवली, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलिंग्स, मॅथ्यू पोट्स, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच आणि जेम्स अँडरसन.
- सामन्याची वेळ : दुपारी ३ वाजल्यापासून (भारतीय वेळेनुसार)
 

Web Title: Will Bumrah lead the campaign Team India ready for the fifth Test against England

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.