Join us

IND Vs WI : भारतीय संघ निवडीवर विराट कोहलीची असणार नजर; बैठकीला राहणार हजर

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड येत्या रविवारी होणार असल्याचे बीसीसीआयने शुक्रवारी जाहीर केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 18:26 IST

Open in App

मुंबई, भारत वि. वेस्ट इंडिज 2019 : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड येत्या रविवारी होणार असल्याचे बीसीसीआयने शुक्रवारी जाहीर केले. 3 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात भारतीय संघ तीन वन डे, तीन ट्वेंटी-20 आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघात बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि त्यामुळे रविवारच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. या बैठकीला निवड समितीच्या पाच सदस्यांसह कर्णधार विराट कोहलीही उपस्थित राहणार आहे. 

India vs West Indies : विंडीज दौऱ्यात टीम इंडियात नव्या खेळाडूंना संधी, 'या' दिग्गजांना विश्रांती?

या निवड समितीवर माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला संधी मिळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वर्ल्ड कप स्पर्धेतील धोनीच्या संथ खेळावर टीका झाली होती. शिवाय आयपीएलपासून तो सातत्यानं खेळत आहे आणि वर्ल्ड कप स्पर्धेत त्याच्या बोटालाही दुखापत झाली होती. त्याशिवाय या बैठकीत जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांनाही विश्रांती देण्याबाबत चर्चा होऊ शकते. बुमराही सातत्याने क्रिकेट खेळत आहे, तर भुवनेश्वर कुमार अजूनही पुर्णपणे तंदुरूस्त झालेला नाही.

''वेस्ट इंडिज दौऱ्यावरील मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्याचा विचार निवड समिती करत आहे. पण, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील दोन कसोटी सामने येथे होणार आहेत आणि त्यात प्रमुख खेळाडूंना विश्रांती देणे भारतासाठी तणावाचे ठरू शकते. त्यामुळे कसोटी मालिकेत प्रमुख खेळाडू संघात परततील,''अशी माहिती सूत्रांनी दिली.

त्यामुळे या मालिकेत नवदीप सैनी, खलील अहमद, कृणाल पांड्या, मनिष पांडे, श्रेयस अय्यर आणि शुबमन गिल यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. हे सर्व खेळाडू सध्या भारत अ संघासोबत वेस्ट इंडिज दौऱ्यावरच आहेत. शिखर धवन आणि पृथ्वी शॉ हे दुखापतीमुळे याही दौऱ्यासाठी उपलब्ध नसतील. 

3 ते 6 ऑगस्ट या कालावधीत तीन ट्वेंटी-20 सामने खेळवण्यात येणार आहेत आणि आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप लक्षात घेता भारतीय संघात काही खेळाडूंना संधी देण्यात येण्याची शक्यता आहे. 8 ते 14 या कालावधीत तीन वन डे सामने होतील. वेस्ट इंडिज दौऱ्यातील कसोटी मालिकेला 22 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.  

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजविराट कोहलीमहेंद्रसिंग धोनीजसप्रित बुमराहबीसीसीआयमोहम्मद शामीभुवनेश्वर कुमारशुभमन गिल