Join us

विराट कोहलीबाबत ही निरर्थक चर्चा का होत आहे?, रोहितकडून पुन्हा बचाव 

"विराटला कोणत्याही सल्ल्याची गरज नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 09:16 IST

Open in App

लंडन : विराट कोहलीच्या खराब फॉर्मबाबत सातत्याने होत असलेल्या चर्चेवर कर्णधार रोहित शर्मा चांगलाच भडकला. विराटचा पुन्हा बचाव करीत तो म्हणाला, ‘ही निरर्थक चर्चा का होत आहे? माझ्या आकलनापलीकडचा हा विषय आहे!’ भारताचा दुसऱ्या वन डेत शंभर धावांनी पराभव झाल्यानंतर पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर रोहितने ताडकन म्हटले, ‘यावर का वारंवार चर्चा होते, मला यागामील कारणही कळेनासे झाले आहे, माझ्या भावा!’ रोहित पुढे म्हणाला, ‘विराट दीर्घकाळापासून सामने खेळत आहे.  तो महान फलंदाज असल्याने त्याला कुणाच्या सल्ल्याची गरज नाही.’

इंग्लिश कर्णधार जोस बटलर यानेही विराटचा बचाव करताना म्हटले की, ‘विराटसारख्या प्रतिभावान खेळाडूला एक मोठी खेळी करण्याची गरज असेल.’ मांसपेशीच्या दुखण्यामुळे पहिल्या वनडेतून बाहेर राहिलेल्या विराटने गुरुवारी १५ धावा काढल्या. त्याआधी टी-२० मालिकेत त्याने १ आणि ११ धावा करताच माजी कर्णधार कपिल देव यांनी विराटला संघाबाहेर का काढत नाही? असा सवाल विचारला होता. रोहितने मात्र कोहलीचे संघातील स्थान सुरक्षित असून, त्याला कुणाच्या सहानुभूतीची गरज नसल्याचे स्पष्ट केले.

विंडीजविरुद्ध आगामी मालिकेतून विराटने विश्रांती मागितली आहे. बटलरनेदेखील कोहलीचा बचाव करताना अखेर कोहलीदेखील एक माणूस आहे. प्रत्येकाचा कठीण काळ असतो. विराट सध्या खराब फॉर्ममध्ये आहे; पण लय मिळविण्यासाठी त्याला एक चांगली खेळी आवश्यक असेल, असे म्हटले आहे. विराटने चांगली खेळी आमच्याविरुद्ध करू नये,’ असेही तो गमतीने म्हणाला.

  • ‘मी आधीही बोललो आहे की फॉर्म वर-खाली होत असतो. प्रत्येक महान खेळाडूच्या कारकिर्दीत चढउतार येतच असतो. 
  • भारतासाठी अनेक सामने जिंकणाऱ्या विराटला फॉर्ममध्ये येण्यासाठी एक- दोन चांगल्या खेळीची गरज आहे. खेळाडूंचा फॉर्म आणि त्याची गुणवत्ता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. 
  • केवळ क्रिकेट नव्हे तर खासगी आयुष्यातही खराब काळ येतोच,’ असे रोहितने सांगितले. व्यस्त वेळापत्रकामुळे खेळाडूंना विश्रांतीची गरज असल्याचा मुद्दा रोहितने अधोरेखित केला.
टॅग्स :भारतीय क्रिकेट संघरोहित शर्माविराट कोहली
Open in App