Join us  

रोहित vs हार्दिक vs सूर्या; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ मध्ये कोणाकडे नेतृत्व? BCCI खेळतेय संगीतखुर्ची

वन डे वर्ल्ड कपनंतर टीम इंडिया आता पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीला लागली आहे. पण,

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2023 6:21 PM

Open in App

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील जेतेपदाचा दुष्काळ संपवेल अशी आशा होती, परंतु संपूर्ण स्पर्धेत अपराजित असलेला आपला संघ फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून हरला. २०११ नंतर भारताच्या वन डे वर्ल्ड कप जिंकण्याच्या स्वप्नांना पुन्हा एकदा धक्का बसला. वन डे वर्ल्ड कपनंतर टीम इंडिया आता पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीला लागली आहे. पण, या वर्ल्ड कप स्पर्धेत संघाचे नेतृत्व नेमकं करणार कोण, हा प्रश्न चाहत्यांना पडतोय... रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांच्यात स्पर्धा रंगताना दिसतेय...

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील दमदार कामगिरीनंतर रोहितनेच ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व सांभाळावे अशी मागणी होतेय. पण, रोहित मागील दीड-दोन वर्ष ट्वेंटी-२० सामने खेळलेला नाही आणि त्याच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्याकडे ही जबाबदारी सोपवली गेली होती. हार्दिकने आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सला नेतृत्व कौशल्याच्या जोरावर पहिल्याच पर्वात ( आयपीएल २०२२) जेतेपद पटकावून दिले, तर आयपीएल २०२३ मध्ये फायनलपर्यंत पोहोचवले. त्यामुळे त्याला भारताच्या ट्वेंटी-२० संघाचा नवा कर्णधार म्हणून पुढे आणण्यात आले. मागील दोन-अडीच वर्षात ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये शिखर धवन ( ३), रिषभ पंत ( ५), हार्दिक ( १६), लोकेश राहुल ( १), जसप्रीत बुमराह ( २), ऋतुराज गायकवाड ( ३) आणि आता सूर्यकुमार यादव ( ५) यांनी भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे.

पण, अमेरिका व वेस्ट इंडिज येथे होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपला आता केवळ ६ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे आणि ही वेळ प्रयोगाची नाही. भारत या कालावधीत केवळ ६ ट्वेंटी-२० सामने खेळणार आहे. त्यात दक्षिण आफ्रिकेविरद्धच्या मालिकेत सूर्यकुमार नेतृत्व करणार आहे. कारण, रोहितने विश्रांती मागितली आहे आणि  वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत दुखापत झालेला हार्दिक अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही. हार्दिक पुनरागमन कधी करतोय, हा खरा प्रश्न आहे. आफ्रिकेनंतर भारताला घरच्या मैदानावर अफगाणिस्तानविरुद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळायची आहे. त्यातही हार्दिकचे खेळणे अशक्य आहे.

या मालिकेनंतर भारतीय खेळाडू आयपीएल २०२४ मध्ये व्यग्र होतील आणि तेथून थेट ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळतील. मग कॅप्टन कोण हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयने रोहितला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये नेतृत्व करण्याची विनंती केली आहे आणि रोहितने तशी खात्री मिळवूनच ती मान्य केली आहे. हार्दिक परतल्यास त्याला उप कर्णधारपद दिले जाईल आणि सूर्या मॅच फिनिशरच्या भूमिकेत दिसेल. पण, रोहितने नकार दिल्यास प्राधान्य हार्दिकला मिळेल, परंतु त्याचे दुखापतीतून सावरणे महत्त्वाचे आहे. 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२भारतीय क्रिकेट संघरोहित शर्मासूर्यकुमार अशोक यादवहार्दिक पांड्या