- अयाज मेमन
चेन्नई: फलंदाजांना सूर गवसल्यामुळे प्ले ऑफमध्ये स्थान निश्चित करणाऱ्या मुंबई इंडियन्सला बुधवारी आयपीएल एलिमिनेटर लढतीत लखनौ सुपर जायंट्सचे आव्हान असेल, मात्र, आत्मविश्वासाच्या जोरावर कृणाल पांड्याच्या नेतृत्वाखालील संघाला धूळ चारण्यास रोहित शर्माचा संघ सज्ज झालेला दिसतो. मुंबईच्या नजरा सहाव्या जेतेपदाकडे आहेत. तर मागच्या सत्रात एलिमिनेटरमध्ये आरसीबीकडून पराभूत झालेला लखनौ संघ यंदा पुढे वाटचाल करण्यास उत्सुक आहे. लोकेश राहुलच्या अनुपस्थितीत काळजीवाहू कर्णधार कृणालने उपलब्ध पर्यायांचा योग्य वापर केला. आयपीएलमधील सर्वांत यशस्वी संघाविरुद्ध विजयी लय कायम राखण्याचे लखनौचे प्रयत्न राहणार आहेत.
मुंबई इंडियन्स
n अष्टपैलू कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, सलामीवीर ईशान किशन, कर्णधार रोहित शर्मा या सर्वांच्या फलंदाजीवर मुंबईचा विजय अवलंबून असेल.
n जसप्रीत बुमराह, जोफ्रा आर्चर यांच्या अनुपस्थितीमुळे वेगवान मारा कमकुवत वाटतो. अनुभवी पीयूष चावलाकडून मोठ्या अपेक्षा.
n चेपॉकच्या मंद खेळपट्टीवर जेसन बेहरेनडोर्फ याची गोलंदाजी निर्णायक भूमिका बजावण्याची शक्यता आहे.
लखनौ सुपर जायंट्स
n मार्कस स्टोयनिस, केली मेयर्स, निकोलस पूरन यांनी धावांचे उपयुक्त योगदान दिले. मुंबईविरुद्ध पुन्हा त्यांच्याकडून दमदार फलंदाजी अपेक्षित असेल.
n लेगस्पिनर रवी बिश्नोई याची भूमिका उपयुक्त ठरेल. नवीन उल हक, आवेश खान, कृणाल, अनुभवी अमित मिश्रा या गोलंदाजांकडूनही आशा.
n मुंबईच्या धडाकेबाज फलंदाजांना लवकर बाद करण्याचे गोलंदाजांपुढे अवघड आव्हान.
स्थळ : चेपॉक स्टेडियम, वेळ : सायंकाळी ७.३० पासून