अयाज मेमन
कन्सल्टिंग एडिटर
दुबई : खेळाच्या मैदानात विजय सर्वस्वी नसतो. पण, ११ भारतीय क्रिकेटपटू रविवारी आशिया चषक क्रिकेट टी-२०च्या फायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध दुबईच्या मैदानात उतरतील, तेव्हा सर्वांच्या बजरा केवळ आणि केवळ विजय मिळविण्याकडेच असतील, स्पर्धेच्या ४१ वर्षांच्या इतिहासात दोन्ही संघ फायनलमध्ये पहिल्यांदा भिडणार आहेत. या हायव्होल्टेज लढतीवर राजकीय नजरादेखील खिळलेल्या असतील.
भारत-पाक लढतीचा रोमांच युद्धापेक्षा कमी नसतो. फरक इतकाच की, या युद्धात गोळीबार होत नाही. आज होणाऱ्या या युद्धाला तणाव, एकमेकांविरुद्ध तक्रारी, उत्तेजक इशाऱ्यांची तसेच दोन्ही संघांतील खेळाडूंना झालेल्या दंडांची किनार लाभली आहे. तरीही चाहत्यांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. यादरम्यान युवा अभिषेक शर्माने २००च्या स्ट्राइक रेटने धावा ठोकून, तर कुलदीप यादवने १३ बळी घेत क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधले. दुर्दैव असे की, खेळाडूंची ही कामगिरी उभय संघांतील खेळाडूंमधील बेबनाव आणि शाब्दिक चकमक या तणावात वाहून जाते.
टोमणे, शिवीगाळ, हातवारे...
याची सुरुवात भारताने पहिल्या सामन्यात हस्तांदोलन टाळून केली. यादवने कर्णधार सूर्यकुमार नाणेफेकीच्या वेळी आणि सामना संपल्यानंतर प्रतिस्पर्धी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नव्हते. याचे उत्तर पाकचा वेगवान गोलंदाज हारिस रौफ याने टोमणे, शिवीगाळ आणि विमान पाडल्याचा इशारा करीत दिले. यामुळे दोघेही आयसीसीच्या रडारवर आले.
अभिषेकवर विसंबून राहू नये
भारताची विजयी मोहीम सहज ठरली; पण जखममुक्त नाही. श्रीलंकेविरुद्ध हार्दिक पांड्याच्या पायाच्या मांसपेशी दुखावल्याने त्याने एक घटक टाकताच मैदान सोडले. अभिषेक शर्मा उकाड्यामुळे त्रस्त आहे. पण, दिलासादायी बाब अशी की, ६ सामन्यांत ३०९ धावा काढणारा अभिषेक खेळण्याइतपत फिट आहे. तिलक वर्माने १४४ धावांचे योगदान दिले. मग अन्य फलंदाज अभिषेकची साथ देतील की नाही? सूर्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
पाकची गोलंदाजी कमकुवत
भारतीय संघ अभिषेकवर अत्याधिक विसंबून आहे. तर, पाकिस्तान संघात कच्चे दुवे आहेत. त्यांचा फलंदाजी क्रम प्रभावी नाही. साहिबजादा फरहान याचा अपवाद वगळता अन्य फलंदाज जबाबदारीने खेळताना दिसले नाहीत. शाहीनशाह आफ्रिदी आणि हारिस रौफ यांनी भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना लवकर तंबूची वाट दाखविल्यास हा सामना कमी धावसंख्येचा होऊ शकेल.
...तर पाकिस्तानला २०० टक्के योगदान द्यावे लागेल!
खरेतर दोन्ही संघांच्या खेळाचा दर्जा इतका विसंगत आहे की, आता त्यांच्यात स्पर्धा असल्यासारखे काही उरलेले नाही. भारतीय संघ आज खेळाच्या शिखरावर आहे, तर पाकिस्तानचा संघ स्मातळात गेला आहे. भारतीय संघाने 'ऑपरेशन सिंदूर'च्या पार्श्वभूमीवर त्यांना स्पर्धेत भाग घेऊ न देण्याची मागणी असो किंवा पाकिस्तानी खेळाडूने जल्लोषात 'गन फायर' केले असो, याद सुरूच राहिले.
आयसीसीला माहीत होते की, स्पर्धा सुरू होण्याआधीच भारत-पाकमधील तणावपूर्ण संबंधाचा प्रभाव मैदानावर नक्कीच दिसणार, मग आयसीसी सावध का नव्हती? आयसीसीने हवे तर जे काही घडले ते थांबवू शकले असते. भारत-पाकिस्तानच्या साखळी सामन्यात मॅच रेफ्री अॅन्डी पायक्रॉफ्ट वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. आता ते कुठेच दिसत नाहीत. खेळाडूंची सुनावणी घेण्यापासून दंड ठोठावण्यापर्यंतचे काम रिची रिचर्डसन करीत आहेत.
या सगळ्या प्रकरणांमुळे अंतिम सामन्यात तणाव राहणारच. पण, भारत विश्वविजेता असल्यामुळे त्याची प्रतिष्ठा मोठी आहे. ती टिकवण्यासाठी विजेता बनावेच लागेल. पाकिस्तानकडे गमावण्यासारखे काहीच नाही. पाकिस्तानला जर विजेता व्हायचे असेल, तर त्याला आपले २०० टक्के द्यावे लागेल. त्यानंतरही जिंकण्याची हमी नाही. भारताच्या दृष्टीने चांगली गोष्ट म्हणजे श्रीलंकेविरुद्धचा सुपर-फोरचा सामना सुपर ओव्हरमध्ये जिंकला. भारताला एका कठीण सामन्याची गरज होती.
या खेळाडूंवर असेल नजर
भारत : अभिषेक शर्मा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव
पाकिस्तान: फखर झमान, मोहम्मद नवाज, शाहीनशाह आफ्रिदी
अभिषेक शर्मा आणि शाहीनशाह आफ्रिदी यांच्यात 'कांटे की टक्कर'
आशिया चषक अंतिम सामन्यात भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माची जबरदस्त फलंदाजी वि. पाकचा डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीनशाह आफ्रिदी याचा अचूक मारा यांच्यात रोमांच आणि 'कांटे की टक्कर' पाहायला मिळेल.
आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये अभिषेकरूपी वादळ चांगलेच घोंगावले आहे. भल्याभल्या गोलंदाजांना त्याने आपल्या आक्रमक फटकेबाजीमुळे पळता भुई थोडी केली. त्यामुळे हाच झंझावात अंतिम सामन्यातही कायम ठेवण्याचा त्याचा प्रयत्न असेल.
शाहीन आक्रमक गोलंदाज आहे. तो दडपण आणण्याचा प्रयत्न करेल. अभिषेकही मागे हटणारा नाही. दोघेही २५ वर्षांचे आहेत. शाहीन पाकिस्तान संघाचा अनुभवी खेळाडू, तर डावखुरा अभिषेक यंदा झंझावाती फलंदाजीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
याआधीच्या दोन्ही सामन्यांत अभिषेकने शाहीनची धुलाई केली. अभिषेकने १४ सप्टेंबरच्या सामन्याची सुरुवात शाहीनच्या फुलटॉसवर थेट चौकार मारून केली. २१ सप्टेंबरला या वेगवान गोलंदाजाला स्क्वेअर हूक मारून षट्कार ठोकला होता.