भारतीय क्रिकेटपटू असलेल्या शिवालिक शर्माला पोलिसांनी बलात्कार प्रकरणात अटक केली. त्याने लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तिच्याशी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला, असा त्याच्यावर आरोप आहे. याप्रकरणी जोधपूरच्या कुडी भगतसुनी हाऊसिंग बोर्ड पोलीस ठाण्यात गेल्या आठवड्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडितेची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर शिवलिकला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. याप्रकरणी पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडिता २०२३ मध्ये गुजरात येथील वडोदरा फिरायला गेली होती, जिथे तिची शिवालिकशी ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले आणि दोघांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. याबाबत दोघांनी आपपल्या घरच्यांना सांगितले. त्यांचा सारखपुडा झाला. साखरपुडा झाल्यानंतर शिवालिकने पीडिताशी जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले. पण त्यानंतर त्याने पीडिताशी बोलणे बंद केले आणि तिच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करू लागला. यानंतर पीडिताने शिवालिकविरोधात गेल्या आठवड्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर आज त्याला अटक करण्यात आली.
शिवालिक हा गुजरातमधील वडोदरा येथील रहिवासी आहे. शिवालिक शर्मा हा डावखुरा फलंदाज अष्टपैलू खेळाडू आहे. शिवालिकने २०१६ मध्ये बिन्नू अंडर-१९ ट्रॉफी स्पर्धेपासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. याशिवाय, तो २०१८- १९ मध्ये रणजी खेळला आहे. त्याने १८ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे आणि १ हजार ८७ धावा केल्या आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये शर्माने १७ डावांमध्ये २४.९२ च्या सरासरीने आणि १४७.८८ च्या स्ट्राईक-रेटने ३४९ धावा केल्या आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ३२२ धावांची नोंद आहे.