भारत विरुद्ध इंग्लंड पाच कसोटी सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. या मालिकेत भारताने आपल्या नावावर खास विक्रम नोंदवून घेतला आहे. कसोटी क्रिकेटच्या एका मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्याबाबत भारताने ३६ वर्षे जुना विक्रम मोडित काढला आहे. या यादीत भारत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. १९८९ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या ६ सामन्यांच्या अॅशेस मालिकेत अॅलन बॉर्डरच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाने ३ हजार ८७७ धावा केल्या. ही मालिका इंग्लंडमध्ये खेळली गेली.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारताने अलिकडेच इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत ४२.३२ च्या सरासरीने एकूण ३ हजार ८०९ धावा केल्या. भारताने इंग्लंडचा ९६ वर्षांचा जुना विक्रम मोडला आहे. भारतीय कर्णधार शुभमन गिलने इंग्लंड दौऱ्यावर सर्वाधिक ७५४ धावा केल्या आहेत, ज्यात चार शतकांचा समावेश आहे. ही मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. या यादीत इंग्लंड संघ तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. १९२८/२९ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने ४३.१८ च्या सरासरीने ३ हजार ७५७ धावा केल्या.
त्यानंतर १९९३ मध्ये इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या अॅशेस मालिकेत अॅलन बॉर्डरच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाने सहा सामन्यांमध्ये ३ हजार ६४१ धावा केल्या. डेव्हिड बूनने या मालिकेत ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक ५५५ धावा केल्या. या यादीत पाचव्या स्थानावर देखील ऑस्ट्रेलियाचा संघ आहे. १९२४/२५ मध्ये घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने ३६.३० च्या सरासरीने एकूण ३ हजार ६३० धावा केल्या आहेत.