बंगळुरू - भारताचा कसोटी क्रिकेटमधील सलामीवीर मयांक अग्रवालसाठी 2019 हे वर्ष घवघवीत यश देणारे ठरले होते. या वर्षात त्याने कसोटी क्रिकेटमध्ये मिळालेल्या प्रत्येक संधीचा पुरेपूर लाभ उठवत आपले नाणे खणखणीत वाजवले. मयांकने आतापर्यंत 9 कसोटीत देशाचे प्रतिनिधित्व केले असून, त्यात त्याने दोन द्विशतके, एक शतक आणि तीन अर्धशतके फटकावलेली आहेत. दरम्यान, सलग दोन कसोटी मालिकांमध्ये फटकावलेल्या दोन द्विशतकांपैकी कुठले द्विशतक खास ठरल असे विचारले असता मयांकने जेव्हा मी खेळपट्टीवर स्थिरावतो त्यानंतर मी मोठी खेळी करून संघाच्या यशात योगदान देतो, हीच बाब माझ्यासाठी खास आहे, असे सांगितले.
26 डिसेंबर 2018 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मयांक अग्रवाल याने दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये द्विशतकी खेळी केल्या होत्या. या द्विशतकी खेळींपैकी कुठली खेळी खास होती, असे विचारले असता मयांक टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत मयांक म्हणाला की, ''प्रामाणिकपणे सांगायचं तर मी तुलना करणाऱ्यांपैकी नाही. दोन्ही खेळ्यांचे आपापल्या जागी महत्त्व आहे. मात्र जेव्हा मी पहिली द्विशतकी खेळी केली होती. तेव्हा ती स्वाभाविकपणे खास होती. त्यानंतर पुढच्याच मालिकेत पुन्हा द्विशतक फटकावणे हेसुद्धा खास आहे. मात्र जेव्हा मी खेळपट्टीवर स्थिरावतो त्यानंतर मी मोठी खेळी करून संघाच्या यशात योगदान देतो, हीच बाब माझ्यासाठी खास आहे.''
वर्षभरातील आपल्या कामगिरीबाबत मयांक म्हणाला की, ''प्रामाणिकपणे सांगायचे तर मला कसोटी संघात स्थान मिळाले आणि मी जेव्हा पहिला सामना खेळतो तेव्हा मला काही विशेष करायचे आहे, असे वाटले नव्हते. मी केवळ एका वेळी एका सामन्यावर लक्ष केंद्रित करून खेळलो. मी माझ्या प्रत्येक फटक्यामधून सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत होतो. आता संघासाठी चांगले योगदान दिल्याने मला समाधान वाटते. त्यातही भारतीय क्रिकेट संघ कसोटी क्रिकेटमध्ये अव्वलस्थानी आहे, ही अधिक समाधानाची बाब आहे.''