Join us  

सचिन तेंडुलकरला राग येतो तेव्हा...; इन्फोसिसच्या कार्यक्रमात सांगितला किस्सा

भारतीय संघ २३ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. या संघाचे नेतृत्त्व सचिन तेंडुलकरकडे देण्यात आले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 2:09 PM

Open in App

मास्टरब्लास्टर आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आपल्या शांत आणि संयमी स्वभावामुळे सर्वपरिचीत आहे. जगभरात सचिनचे फॅन्स असून मैदानावरील अनेक प्रसंगातून सचिनची नम्रता आणि संयमी वृत्ती जगभरातील क्रिकेटप्रेमींनी पाहिली आहे. मात्र, सचिन तेंडुलकरलाही राग येतो.... होय सचिनलाही एकदा राग आला होता. त्यावेळी, भारतीय संघाचा कर्णधार असलेल्या सचिनने संघातील खेळाडूला चांगलाच दम भरला होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना सचिनने प्रथमच एका खेळाडूला रागावले होते. 

भारतीय संघ २३ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. या संघाचे नेतृत्त्व सचिन तेंडुलकरकडे देण्यात आले होते. त्यावेळी, कर्णधार असल्याने सचिनवर मोठी जबाबदारी होती. मात्र, एका तरुण खेळाडूने काही चूक केल्यामुळे सचिन त्याच्यावर चांगलाच भडकला होता. विशेष म्हणजे भारतात परत पाठवण्याचा दमही सचिनने या युवा खेळाडूला भरला होता. सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसच्या एका कार्यक्रमामध्ये सचिनने या गोष्टीचा उलगडा केला. 

''आम्ही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होतो, आमच्यासवेत एक तरुण खेळाडू होता. तो प्रथमच विदेश दौऱ्यावर आला होता. मात्र, मैदानात फिल्डींग करतेवेळी तो क्रिकेटपेक्षा अधिक लक्ष प्रेक्षकांमधील गोंधळाकडे देत होता. त्यामुळे, त्याचा निष्काळजीपणा दिसून आला. जेथे एक रन जावा, तेथे दोन रन दिले जात होते. त्यावेळी, मी त्या खेळाडूला बोलावून रागावले, जर पुन्हा अशी चूक केली तर मी तुला मायदेशी परत पाठवेन, असेही ओरडलो'', अशी आठवण सचिनने सांगितली होती. 

सन १९९९ ते २००० या कालावधीत भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता, त्यावेळी संघाचा कर्णधार सचिन तेंडुलकर होता. या दौऱ्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून क्लीन स्वीप मिळाला होता, भारताचा तिन्ही कसोटी सामन्यात पराभव झाला होता. 

टॅग्स :सचिन तेंडुलकरआॅस्ट्रेलियाभारतीय क्रिकेट संघ
Open in App