भारतीय महिला क्रिकेट संघाची उप कर्णधार आणि सलामीवीर स्मृती मानधना हिने रविवारी श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या चौथ्या टी २० सामन्यात दमदार फलंदाजी केली. पहिल्या तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर स्मृती मानधनाची बॅट तळपली आणि ८० धावांच्या खेळीसह तिने अनेक विक्रम प्रस्थापित केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा पल्ला गाठणारी ती महिला क्रिकेट जगतातील चौथी आणि मिताली राजनंतर दुसरी भारतीय ठरली. हा मैलाचा पल्ला गाठल्यावर तिने दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
४८ चेंडूंमध्ये ८० धावांची धमाकेदार खेळी
तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात स्मृतीनं ४८ चेंडूंमध्ये ११ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ८० धावा केल्या. शेफाली वर्मासोबत ४६ (७९) पहिल्या विकेटसाठी १६२ धावांची विक्रमी भागीदारी केली. या कामगिरीनंतर स्मृती म्हणाली की, जे झालं ते झालं आता पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागेल. इथं जाणून घेऊयात ती नेमकं काय म्हणाली त्यासंदर्भातील खास गोष्ट
स्मृती मानधना- शेफाली वर्माचा महाविक्रम; टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचणारी पहिली जोडी!
नेमकं काय म्हणाली स्मृती मानधना?
बीसीसीआयने अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन स्मृती मानधनाचा एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये स्मृती मैलाचा पल्ला गाठल्यानंतरच्या आपल्या भावना व्यक्त करताना पाहायला मिळते. ती म्हणते की; ”१० हजार धावा पूर्ण झाल्या असल्या तरी पुढील सामना पुन्हा शून्यापासूनच सुरू होतो. क्रिकेटमध्ये असं कधीच होत नाही की, मागच्या सामन्यात केलेली कामगिरी पुढच्या सामन्यात उपयोगी पडेल. प्रत्येक वेळी तुम्हाला शून्यापासून सुरुवात करावी लागते. स्कोअरबोर्ड नेहमी शून्यापासूनच सुरू होतो.”
जबरदस्त कमबॅक
यावेळी स्मृती मानधना क्रिकेटच्या तिन्ही प्रकाराकडे वेगवेगळ्या नजरेनं पाहते, हेही सांगितले. ती म्हणाली की, तिन्ही प्रकारातून वेगवेगळ्या अपेक्षा असतात. टी-२० मध्ये तुम्ही फार काळ टिकण्यापेक्षा वेगाने खेळणे अपेक्षित असते. प्रत्येक दिवस तुमचा नसतो. काही वेळा तुम्हाला अपयश येते, असेही ती म्हणाली. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या तिन्ही सामन्यात स्मृती मानधनाला चांगली सुरुवात मिळाली, पण प्रत्येक वेळी ती स्वस्तात माघारी फिरली. पण चौथ्या टी-२० सामन्यात तिने आपल्यातील कमबॅकची क्षमता दाखवून देत अनेक विक्रमांना गवसणी घातल्याचे पाहायला मिळाले. खास गोष्ट म्हणजे स्मृती मानधना हिने वैयक्तिक आयुष्यात आलेल्या वादळानंतर मैदानात उतरत आपल्यातील कणखर मानसिकतेच दर्शनही दिले आहे.