Join us  

'इतका मोठा मुद्दा बनवण्याची काय गरज', विराट कोहलीला आराम देण्यावरुन राहुल द्रविडने मांडलं मत 

'रोटेशन गरजेचं आहे. खूप सामने खेळले जात आहेत, त्यामुळे खेळाडूंना रोटेट करणं गरजेचं आहे. खेळाडूंना रोटेट करण्यासंबंधी व्यवस्थापन योग्य निर्णय घेत आहे', असं राहुल द्रविड बोलला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 4:31 PM

Open in App

मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि अंडर-19 क्रिकेट संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने विराट कोहलीला पुढील महिन्यापासून सुरु होणा-या श्रीलंका सीरिजसाठी आराम देण्यात येण्यावरुन सुरु असलेल्या चर्चेला महत्व दिलेलं नाही. विराट कोहलीने सलग होणा-या सीरिजमुळे खेळाडूंना येणा-या थकव्यावर आपलं मत मांडलं होतं. विराट कोहलीला श्रीलंकेविरोधात खेळण्यात येणा-या सीरिजसाठी आराम देण्यात येणार असल्याच्या बातम्या येत होत्या. जेणेकरुन दक्षिण अफ्रिकेविरोधातील सीरिजसाठी खेळण्याआधी विराट कोहली नव्या दमाने मैदानात उतरेल. मात्र विराट कोहलीला श्रीलंकेविरोधातील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी विराट कोहलीची संघात निवड झाली आहे. अशा परिस्थितीत तिस-या सामन्यासाठी आणि यानंतर होणा-या एकदिवसीय सामन्यांसाठी कोहलीला आराम देण्यात येऊ शकतो. 

महिला क्रिकेट खेळाडू मिताली राज आणि झुलन गोस्वामी यांचा सत्कार करण्यासाठी आयोजित एका कार्यक्रमात राहुल द्रविडने खेळाडूंना आराम देण्यावरुन आपलं मत मांडलं आहे. 'रोटेशन गरजेचं आहे. खूप सामने खेळले जात आहेत, त्यामुळे खेळाडूंना रोटेट करणं गरजेचं आहे. खेळाडूंना रोटेट करण्यासंबंधी व्यवस्थापन योग्य निर्णय घेत आहे', असं राहुल द्रविड बोलला आहे. 

राहुल द्रविडने सांगितलं आहे की, 'प्रत्येकाला आराम करण्याची गरज आहे. जेव्हा विराट कोहलीला आराम हवा असेल, तेव्हा त्याला दिला जाईल. विराट कोहलीला केव्हा आणि कोणत्या सीरिजदरम्यान आराम घ्यायचा आहे याचा निर्णय व्यवस्थापन, फिजिओ आणि फिजिकल ट्रेनर यांच्याशी चर्चा केल्यानंतर तो घेईल. कदाचित सध्या त्याला आराम करायचा नाहीये. नंतर त्याला गरज लागेल. याला इतकी मोठी गोष्ट बनवण्याची काय गरज आहे हे मला कळत नाही'. 

यावेळी राहुल द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) बॅटच्या साईजवरुन लागू करण्यात आलेल्या नव्या नियमावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. जोपर्यंत मैदानांची स्थिती सुधारली जात नाही तोपर्यंत या नियमाने काही फरक पडणार नाही असं राहुल द्रविड बोलला आहे. 

कोहलीची विश्रांती लांबवली...संघनिवडीआधी कर्णधार विराट कोहलीला विश्रांती मिळणार असल्याची मोठी चर्चा रंगली. मात्र, कोहलीने न्यूझीलंडविरुद्धची टी-२० मालिका आणि लंकेविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांदरम्यान ब्रेक न घेण्याचा निर्णय घेतला आहे. लंकेविरुद्धचे पहिले दोन कसोटी सामने अनुक्रमे कोलकाता व नागपूर येथे खेळविण्यात येतील. त्याचवेळी, कर्णधारासाठीही रोटेशन पद्धतीचा अवलंब करण्यात येईल, असे राष्ट्रीय निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी म्हटले आहे.

आगामी श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी राष्ट्रीय निवड समितीने भारतीय क्रिकेट संघाची घोषणा केली असून मुंबईकर अजिंक्य रहाणेची उपकर्णधारपदी निवड झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी १६ सदस्यांच्या भारतीय कसोटी संघाची घोषणा केली. त्याचवेळी, न्यूझीलडंविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठीही टीम इंडिया घोषित करण्यात आली असून यामध्ये मुंबईकर श्रेयस अय्यर आणि हैदराबादचा मोहम्मद सिराज यांची संघात वर्णी लागली आहे.

मुंबईतील बीसीसीआय कार्यालयामध्ये टी-२० आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. कसोटी मालिकेसाठी रविचंद्रन आश्विन आणि रवींद्र जडेजा या स्टार फिरकी गोलंदाजांनी अपेक्षेप्रमाणे पुनरागमन केले आहे. मात्र, त्याचवेळी टी-२० मालिकेसाठी मात्र दोघांनाही संघात स्थान मिळालेले नाही. याआधीही ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेतून दोघांना वगळण्यात आले होते. त्याचवेळी, श्रेयस अय्यर व मोहम्मद सिराज या दोन युवा खेळाडूंना टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे.

१ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबरदरम्यान न्यूझीलंडविरुद्धची टी-२० मालिका होणार असून यानंतर श्रीलंका संघ भारत दौ-यावर येणार आहे. १६ नोव्हेंबरपासून भारत - श्रीलंकादरम्यान तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होईल. यानंतर १० ते १७ डिसेंबरदरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळविण्यात आल्यानंतर २० ते २४ डिसेंबर दरम्यान तीन टी-२० सामन्यांची मालिका पार पडेल. या मालिकेनंतर जानेवारी महिन्यात भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौºयावर जाईल.

टॅग्स :राहूल द्रविडविराट कोहलीक्रिकेटभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय