Join us

वेस्ट इंडिजचे महान खेळाडू कर्टनी वॉल्श कोल्हापूर टस्कर्सच्या खेळाडूंशी साधला संवाद 

वेस्ट इंडिजचे माजी वेगवान गोलंदाज कर्टनी वॉल्श यांनी पुण्यातील PYC हिंदू जिमखाना येथे संघाच्या प्रशिक्षण सत्राला भेट दिली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 19:03 IST

Open in App

पुणे : खेळाडूंना अनेक स्तरांतून प्रेरणा मिळू शकते, परंतु जेव्हा दिग्गज खेळाडू युवा क्रिकेटपटूंना महत्वाच्या टीप्स देण्यासाठी येतात तेव्हा वातावरण मंत्रमुग्ध होऊन जाते. महाराष्ट्र प्रीमियर लीगमधील कोल्हापूर टस्कर्सच्या खेळाडूंना असा अविस्मरणीय अनुभव आला, जेव्हा वेस्ट इंडिजचे माजी वेगवान गोलंदाज कर्टनी वॉल्श यांनी पुण्यातील PYC हिंदू जिमखाना येथे संघाच्या प्रशिक्षण सत्राला भेट दिली.

कसोटीत ५०० बळी घेणाऱ्या पहिल्या खेळाडूचा मान पटकावलेल्या वॉल्श यांनी खेळाडूंसोबत बराच वेळ घालवला. त्यांच्या स्वतःच्या कारकिर्दीबद्दल त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरेही दिली.  संवादादरम्यान खेळाडूंना संबोधित करताना ६१ वर्षीय वॉल्श यांनी नियंत्रित आक्रमकतेच्या महत्त्वावर भर दिला. "नियंत्रणाशिवाय आक्रमकता हानिकारक असू शकते. कधी फलंदाज जिंकतो तर कधी गोलंदाज, परंतु जर तुम्ही आक्रमकतेवर नियंत्रण ठेवू शकता आणि योजना ८०-९०% चांगल्या प्रकारे अंमलात आणू शकत असाल, तर तुम्ही जास्त वेळा यशस्वी व्हाल,” असे ५१९ कसोटी बळी आणि २२७ एकदिवसीय विकेट्ससह आपली कारकीर्द संपवणाऱ्या वेस्ट इंडिजच्या माजी कर्णधार वॉल्श यांनी सांगितले.

भारताचा माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू केदार जाधव याच्या नेतृत्वाखालील कोल्हापूर टस्कर्सने गेल्या वर्षी महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या पहिल्या आवृत्तीत उपविजेतेपद पटकावले होते. या वर्षी ट्रॉफी उचलण्याची तयारी करत असताना त्यांनी अनुभवी अष्टपैलू श्रीकांत मुंढे आणि यष्टीरक्षक फलंदाज अनिकेत पोरवाल यांना संघात सामील करून त्यांच्या संघाला आणखी मजबूत केले आहे. 

कोल्हापूर टस्कर्स संघ - केदार जाधव, अंकित बावणे, सचिन धस, हर्ष संघवी, कीर्तिराज वाडेकर, अनिकेत पोरवाल, हृषीकेश दौंड (अंडर-१९), योगेश डोंगरे, तरनजीत सिंग, आत्मा पोरे, अक्षय दरेकर, श्रेयश चव्हाण, यश खळदकर, निहाल तुसामद, मनोज यादव, डॉ.  उमर शहा, हर्षल मिश्रा (अंडर-१९), सुमित मरकली, सिद्धार्थ म्हात्रे, श्रीकांत मुंढे.

टॅग्स :पुणेवेस्ट इंडिज