Join us

Asian Games 2023 : 'सोनेरी' कामगिरीनंतर भारतीय महिला संघाचं मुंबई विमानतळावर भव्य स्वागत, VIDEO

आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाचं मुंबईत भव्य स्वागत करण्यात आलं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 17:35 IST

Open in App

मुंबई : चीनच्या धरतीवर ऐतिहासिक कामगिरी करून सुवर्ण पदक जिंकणाऱ्या भारतीय महिला संघाचं मायदेशात जंगी स्वागत करण्यात आलं. बुधवारी सकाळी भारतीय महिला संघातील शिलेदार मुंबई विमानतळावर दाखल झाले. खरं तर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील भारतीय महिला संघाने अंतिम फेरीत श्रीलंकेला चीतपट करून तमाम भारतीयांना खुशखबर दिली. या विजयासह भारताने ऐतिहासिक सुवर्ण पदकावर नाव कोरले. 

भारतात परतल्यानंतर संघाची उप कर्णधार स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्ससह संपूर्ण भारतीय संघाचे मुंबई विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आलं. मुंबई विमानतळावर पोहोचताच चाहत्यांनी आणि खेळाडूंच्या कुटुंबीयांनी संपूर्ण देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी करणाऱ्या मुलींचे फुलांचा हार घालून स्वागत केले आणि ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये खेळाडूंचे चाहते आणि कुटुंबातील सदस्य मुंबई विमानतळावर 'इंडिया, इंडिया'चे नारे देताना दिसत आहेत. त्यानंतर त्यांनी स्मृती मानधना आणि इतर खेळाडूंना पुष्पहार देऊन त्यांचे अभिनंदन केले.  

भारतीय महिलांची 'सोनेरी' कामगिरी आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेला पराभूत करून सुवर्ण पदक जिंकले. या विजयात स्मृती मानधनाने मोलाची भूमिका बजावली. सोमवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव करत सोनेरी कामगिरी केली. भारताने सुवर्ण पदक पटकावले, तर श्रीलंकेला रौप्य आणि बांगलादेशला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. अंतिम सामन्यात भारताने ११६ धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात श्रीलंकेला निर्धारित २० षटकांत केवळ ९७ धावा करता आल्या.

टॅग्स :आशियाई स्पर्धा २०२३भारतीय महिला क्रिकेट संघस्मृती मानधनामुंबई