कोलंबो : ‘आम्ही आयसीसी विश्वचषक त्यांच्यासाठी जिंकू इच्छितो, ज्यांनी देशातील महिला खेळाच्या प्रगतीस हातभार लावला आहे. यासाठी संघातील खेळाडू बाहेरील चर्चांपासून दूर राहून केवळ आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत आहेत,’ असे भारताची फलंदाज जेमिमा रॉड्रिग्स हिने सांगितले.
भारतीय संघ दोनदा उपविजेता राहिल्यानंतर पहिल्या विश्वविजेतेपदाच्या शोधात आहे. जेमिमाने ‘जिओस्टार’शी संवाद साधताना सांगितले की, ‘आम्ही एकावेळी एका दिवसाचा विचार करतो आणि वर्तमानात जगतो. अगदी संघाच्या अंतर्गत चर्चेतही आम्ही स्वतःचे सकारात्मक वातावरण तयार करण्यावर लक्ष केंद्रित करतो. कारण, आम्हाला माहीत आहे की, विश्वचषकाभोवती किती गोंधळ असतो.’
ती पुढे म्हणाली, ‘आम्ही चांगले प्रदर्शन करू किंवा आव्हानांना सामोरे जाऊ, आम्हाला या सगळ्या गोष्टी बाहेर ठेवायच्या आहेत आणि स्वतःची ऊर्जा निर्माण करायची आहे. या संघात प्रत्येक जण एकमेकांची काळजी घेतो आणि एकमेकांच्या यशाचा आनंद साजरा करतो. आम्ही त्यांच्यासाठी जिंकू इच्छितो, ज्यांनी मार्ग तयार केला आहे. मिताली राज, झुलन गोस्वामी, नीतू मॅडम (नीतू डेविड) आणि इतर सर्वांसाठी ज्यांनी महिला क्रिकेटला आज या उंचीवर नेले.’
क्रांती झटपट जुळवून घेते
क्रांती गौडचा आंतरराष्ट्रीय स्तरावर अनुभव अजून मर्यादित आहे. कारण, तिने याच वर्षी पदार्पण केले आहे. पण, सर्वांत प्रभावी बाब म्हणजे, ती पटकन शिकते आणि स्वतःला परिस्थितीनुसार जुळवून घेते. ती कठोर मेहनत करत आहे आणि विविध परिस्थितींमध्ये चांगल्या प्रकारे रुळत आहे. इंग्लंड असो, श्रीलंका असो किंवा गुवाहाटी असो, ती स्वतःच्या ताकदीला ओळखते आणि लगेच योग्य लाइन व लेंथ मिळवते.
मिताली राज, माजी भारतीय कर्णधार
आणखी वेगाने गोलंदाजी करायची आहे : क्रांती गौड
‘आतापर्यंत प्रशिक्षकांनी माझ्या वेगाबद्दल काही सांगितलेले नाही. आमचे लक्ष एकसमान लाइन आणि लेंथ ठेवण्यावर आहे. फार काही वेगळे करण्याचा मी प्रयत्न करत नाही. सध्या मी माझ्या वेगाबाबत समाधानी आहे; पण मला आणखी अधिक वेगाने गोलंदाजी करायची आहे’, असे भारताची वेगवान गोलंदाज क्रांती गौड हिने सांगितले. क्रांतीच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने रविवारी पाकिस्तानला महिला विश्वचषक स्पर्धेतील सामन्यात सहज नमवले. पाच महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारी क्रांती अल्पावधीत भारताच्या वेगवान गोलंदाजीची धुरा बनली आहे.
क्रांतीने पाकविरुद्धच्या सामन्यानंतर सांगितले की, ‘माझे भारतासाठी पदार्पण श्रीलंकेतच झाले होते आणि आज मी येथे सामन्याची सर्वोत्तम खेळाडू ठरली. हा क्षण माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी अभिमानाचा आहे.’ क्रांतीने पाकविरुद्ध स्वत:च्याच गोलंदाजीवर सदफ शमसचा झेल घेतल्यानंतर आलिया रियाजलाही माघारी धाडले आणि पाकिस्तानचा डाव ३ बाद २६ धावा असा गडगडला. क्रांती म्हणाली की, ‘मी दुसरी स्लिप कायम ठेवण्याची विनंती केली. यानंतर आलियाचा झेल दुसऱ्या स्लिपमध्येच गेला.’