ICC World Cup India vs Pakistan : भारतात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत वन डे वर्ल्ड कप होतोय... इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड या सामन्याने वर्ल्ड कप स्पर्धेची सुरुवात होत असली तरी सर्वांना उत्सुकता आहे ती भारत-पाकिस्तान लढतीची. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर १५ ऑक्टोबरला हा हाय व्होल्टेज सामना होणार आहे. सुरुवातीला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ही मॅच अहमदाबाद येथे नको यासाठी जोर धरला होता, परंतु ICC ने ही मॅच तिथेच खेळवणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे अहमदाबाद येथील हॉटेल्सच्या भावची गगनाला भिडले आहेत. एवढी या सामन्याची उत्सुकता आहे. पण, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) याचे म्हणणे काही वेगळेच आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघाला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत एकदाही भारतावर विजय मिळवता आलेला नाही. २०२१मध्ये ट्वेंटी-२० स्पर्धेत पाकिस्तानने विजय मिळवून भारताविरुद्धची पराभवाची मालिका खंडीत केली होती. आता बाबर आजमच्या नेतृत्वाखाली वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील पराभवाची मालिका खंडित करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. पाकिस्तानचा संघ सध्या श्रींकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी तयारी करतोय आणि त्यासाठीच्या आज झालेल्या पत्रकार परिषदेत बाबर आजमने IND vs PAK लढतीवर त्याचे मत मांडले.
''आम्ही वर्ल्ड कप स्पर्धेत फक्त भारताविरुद्धच खेळणार नाही आहोत... आमच्यासह तेथे १० संघ सहभागी होणार आहेत. त्यामुळे फक्त भारताविरुद्धच्या लढतीवर आमचं लक्ष केंद्रीत नाही. आम्हाला सर्व संघांविरुद्ध चांगली कामगिरी करून फायनलमध्ये जायचं आहे. वेळापत्रकानुसार जिथे सामना आहे, तिथे जाऊन जिंकायचं आहे,''असे बाबर म्हणाला. बाबरने १०० वन डे सामन्यांत ५९.१७च्या सरासरीने ५०८९ धावा केल्या आहेत. १८ शतकं व २६ अर्धशतकं त्याच्या नावावर आहेत.
पाकिस्तान संघांचे वेळापत्रक
६ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. श्रीलंका, हैदराबाद
१२ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. क्वालिफायर २, हैदराबाद
१५ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, अहमदाबाद
२० ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान, बंगळुरू
२३ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. अफगाणिस्तान , चेन्नई
२७ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. दक्षिण आफ्रिका, चेन्नई
३१ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. बांगलादेश, कोलकाता
४ नोव्हेंबर - न्यूझिलंड वि. पाकिस्तान, बंगळुरू
१२ नोव्हेंबर - इंग्लंड वि. पाकिस्तान, कोलकाता