WCL 2025 India vs Pakistan : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स २०२५ च्या दुसऱ्या हंगामातील भारत-पाकिस्तान यांच्यात २० जुलै रोजी नियोजित सामना रद्द करण्यात आला होता. यासंदर्भात अधिकृत घोषणा केल्यावर आता WCL आयोजकांनी दोन्ही संघांना प्रत्येकी १- १ गुण विभागून दिला आहे. पण ही गोष्ट पाकिस्तानला मान्य नाही, भारतीय खेळाडूंनी माघार घेतल्याचे सांगत पाक संघाने गुण विभागणीला विरोध केल्याचे समोर येत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पाकिस्तानला खटकली, WCL आयोजकांनी घेतली भारताची बाजू
एएनआयने WCL च्या सूत्रांच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तान चॅम्पियन्स संघाने गुण विभागणीवर आक्षेप नोंदवला आहे. पाक विरुद्ध न खेळण्याचा निर्णय हा भारतीय संघातील खेळाडूंचा होता. त्यामुळे गुण विभागून देण्याचा प्रश्नच उरत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. पण यासंदर्भात WCL आयोजकांनी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डासमोर आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. आयोजकाच्या रुपात सामना खेळवण्यासाठी आम्ही असमर्थ ठरलो. यात भारतीय संघाची कोणतीही चूक नाही, असे WCL आयोजकांनी म्हटले आहे. त्यामुळे पाकिस्तानला ही गोष्ट पटलेली नसली तरी शेवटी कमेटीचा निर्णयच त्यांना मान्य करावा लागेल, असे दिसते.
मिताली ते स्मृती! जाणून घ्या वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय 'रन'रागिणींचा खास रेकॉर्ड
भारत-पाक संघ सेमीत भिडणार नाही, पण...
इंडिया चॅम्पियन्स संघ WCL स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध खेळणार नाही, यासंदर्भात शिखर धवन आणि सुरेश रैना यांनी उघड भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले होते. या स्पर्धेच्या पहिल्या हंगामात भारत-पाकिस्तान यांच्यातल जेतेपदासाठी लढत रंगली होती. पहिला हंगाम भारतीय संघाने गाजवला. आता नव्या हंगााची सुरुवात वादासह झालीये. साखळी फेरीतील सामना रद्द झाल्यावर सेमीत दोन्ही संघ एकमेकांसोबत भिडणार नाहीत, यासाठी आयोजक प्रयत्नशील आहेत. पण जर पुन्हा एकदा हे दोन्ही संघ फायनलमध्ये पोहचले, तर काय करायचं हा मोठा प्रश्न आयोजकांसमोर असेल.
WCL 2025 गुणतालिकेत कोणता संघ कितव्या स्थानी?
या स्पर्धेत भारत चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स या दोन संघांसह दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड या सहा संघांचा समावेश आहे. पाकिस्तानच्या संघाने २ पैकी एक विजय अन् एका अनिर्णित सामन्यासह ३ गुण खात्यात जमा केले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या खात्यात १ सामन्यातील विजयासह २ गुण जमा असून हा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियन संघ एका अनिर्णित सामन्यातील एका गुणासह तिसऱ्या आणि भारतीय संघ पाकिस्तान विरुद्धच्या अनिर्णित सामन्यासह १ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडच्या खात्यात एक पराभव आणि १ अनिर्णित राहिलेल्या सामन्यासह १ गुण जमा आहे. वेस्ट इंडिजनं एक सामना खेळला असून पहिल्या पराभवामुळे त्यांनी अजूनही गुणांचे खाते उघडलेले नाही.