मँचेस्टर : मँचेस्टर युनायटेड आणि युव्हेंटस यांच्यात चॅम्पियन्स लीगमध्ये मंगळवारी मध्यरात्री झालेला सामना चुरशीचा ठरला. युव्हेंटसच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेला ख्रिस्तियानो रोनाल्डो माजी क्लब युनायडेटविरुद्ध खेळला. या सामन्यात युव्हेंटसने 1-0 असा विजय मिळवला असला तरी रोनाल्डोवरील युनायटेड चाहत्यांचे प्रेम तसूभरही कमी न झालेले पाहायला मिळाले. युनायटेडच्या चाहत्यांकडून रोनाल्डोचे अनोखे स्वागत करण्यात आले.
सर अॅलेक्स फर्ग्युसन यांनी 2003 साली रोनाल्डोला स्पोर्टिंग सीपी क्लबमधून युनायटेड क्लबमध्ये घेऊन आले. त्यानंतर 2009 पर्यंत रोनाल्डो युनायटेडकडून खेळला. 2009 मध्ये रेयाल माद्रिदने त्याला 84.60 मिलियन डॉलरमध्ये करारबद्ध केले आणि 2018 मध्ये रोनाल्डो युव्हेंटसकडून खेळत आहे. 15 वर्षांनंतरही रोनाल्डोची युनायटेड चाहत्यांवरील मोहिनी कायम आहे. याचा प्रत्यय मंगळवारी मध्यरात्री झालेल्या सामन्यात आला.
13 व्या मिनिटाला पॉल डिबालाने गोल करताना युव्हेंटसला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दोन्ही संघाकडून चुरशीचा खेळ पाहायला मिळाला. पण, रोनाल्डोच्या अनोख्या स्वागताने हा सामना चर्चेत राहिला.
H गटात युव्हेंटसने तीन सामन्यांनंतर 9 गुणांसह अव्वल स्थान कायम राखले आहे. त्यापाठोपाठ मँचेस्टर युनायटेड ( 4), व्हॅलेंसिया (2) आणि यंग बॉय (1) हे क्लब आहेत.