Join us

अरे देवा... पाकिस्तानी खेळाडूची मैदानात येतानाच फजिती, दोन पावलं टाकून मग 'धडाम्'... (Video)

या घटनेचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसतोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 21:09 IST

Open in App

Pakistan Arafat Minhas, Video: आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये हाँगकाँग विरूद्धच्या सामन्यात पाकिस्तानने दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानच्या संघाने २० षटकांमध्ये १६० धावा केल्या. हाँगकाँगचा तुलनेने नवखा असलेला संघ हे आव्हान पेलू शकला नाही. पाकिस्तानच्या गोलंदाजीपुढे त्यांना शंभरीही गाठता आली नाही. ९२ धावांवर त्यांचा डाव आटोपला. त्यामुळे पाकिस्तानला ६८ धावांनी मोठा विजय मिळवता आला. या सामन्यात पाकिस्तानी खेळाडूला एका विचित्र प्रकाराला सामोरं जावं लागलं.

सामन्यात १२व्या षटकात पाकिस्तानी खेळाडूसोबत एक फारच मजेशीर प्रकार घडला. १२.३ षटकात पाकिस्तानच्या संघाने ६ बाद ७३ धावा केल्या होत्या. खुशदील शाह बाद झाल्यानंतर अराफात मिन्हास हा नवा फलंदाज मैदानात आला. तो मैदानात येत असताना वॉर्म-अप करत आत येत होता. मैदानावर असलेल्या सीमारेषेतून तो आत आला. त्यानंतर दोन पावलं पुढे आला असता अचानक त्याचा तोल गेला. तो पडणारच होता, पण त्याने हाताचा आधार घेऊन स्वत:ला सावरलं आणि तो पुढे खेळण्यासाठी निघाला. घडलेला प्रकार मजेशीर असल्याने याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

दरम्यान, त्याने मैदानात येऊन दमदार फलंदाजी केली. १६ चेंडूत २ चौकार आणि २ षटकार खेचत त्याने २५ धावा केल्या. याशिवाय आमिर जमालने १६ चेंडूत ४१ तर असिफ अलीने २१ चेंडूत २५ धावा केल्या. हाँगकाँगकडून अयुष शुक्लाने ४९ धावांमध्ये ४ बळी टिपले. १६१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हाँगकाँगचा डाव मात्र ९२ धावांत आटोपला. त्यांच्याकडून बाबर हयातने सर्वाधिक २९ धावा केल्या.

टॅग्स :आशियाई स्पर्धा २०२३पाकिस्तानसोशल मीडियासोशल व्हायरल