मुंबई - वॉशिंग्टन सुंदर (वय १८) आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात पदार्पण करणारा सर्वात युवा भारतीय खेळाडू ठरला. याआधी दिल्लीचा रिषभ पंत याने वयाच्या १९व्या वर्षी इंग्लंडविरुद्ध टी२० पदार्पण करत सर्वात युवा खेळाडू होण्याचा मान मिळवला होता. हाँगकाँगच्या वकास खान याच्या नावावर सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात पदार्पण करण्याचा विक्रम असून त्याने वयाच्या १५व्या वर्षी नेपाळविरुद्ध कोलोंबो येथे पदार्पण केले होते.
तिसऱ्या टी-20 लढतीमध्ये श्रीलंकेने भारतासमोर विजयासाठी 136 धावांचे आव्हान ठेवले. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर भारतीय गोलंदाजांनी पाहुण्या लंकेच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. त्यामुळे भारतासमोर मोठे आव्हान ठेवण्यात श्रीलंकेला अपयश आले. त्यांना 20 षटकांत 7 बाद 135 धावाच करता आल्या. पहिल्या दोन लढतीत विजय मिळवल्यानंतर आता तिसऱ्या लढतीतही विजयी मालिका कायम राखत श्रीलंकेवर निर्विवाद वर्चस्व राखण्याचा भारतीय संघाचा इरादा आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच भेदक गोलंदाजी केली. पदार्पणवीर वॉशिंग्टन सुंदर, जयदेव उनाडकट आणि हार्दिक पांड्या यांच्या अचूक माऱ्यामुळे श्रीलंकन फलंदाजांना फटकेबाजीसाठी फारशी मोकळीक मिळाली नाही. त्यातच अशेला गुणरत्नेचा (36) अपवाद वगळता श्रीलंकेचा एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकून खेळ करू शकला नाही. भारताकडून जयदेव उनाडकट आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी 2 तर वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.