कोरोना व्हायरसमुळे भारतीय क्रिकेटविश्वालाही हादरवून सोडलं. भारतीय महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णमुर्तीनं तिच्या आई व बहिणीला गमावलं, तर प्रिया पुनियाच्या आईचेही नुकतेच निधन झाले. आता आणखी एका भारतीय क्रिकेटपटूच्या घरी कोरोनामुळे दुःखद घटना घडली आहे. भारतीय कसोटी संघाचा सलामीवीर अभिनव मुकुंद ( Abhinav Mukund) याच्या आजोबांचे कोरोनामुळे गुरुवारी निधन झाले. मुकुंदनं ट्विट करून याबाबतची माहिती दिली. याच दिवशी टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार याच्या वडिलांचे कर्करोगामुळे निधन झाले. ३१ वर्षीय मुकुंदनं भारतीय संघाकडून ७ कसोटी सामने खेळले आहेत. मुकुंदनं ७ कसोटीत ३२० धावा केल्या आणि त्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे.
अभिनवनं ट्विट केले की,''मला हे सांगताना दुःख होतंय की, कोरोनामुळे माझे आजोबा सुब्बाराव यांचे निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. ''
मुकुंदनं २०११मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यातून टीम इंडियासाठी पदार्पम केलं. त्यानंतर तो २०११मध्ये इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाचा सदस्य होता. कसोटीत ८१ धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. २०१७मध्ये त्यानं अखेरचा कसोटी सामना खेळला आहे. तामिळनाडूच्या या क्रिकेटपटूनं स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्यानं १४५ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४७.९३च्या सरासरीनं १०२५८ धावा केल्या आहेत. त्यात ३१ शतकं व ३७ अर्धशतकांचा समावेश आहे.