Join us  

विराटने डाव सावरला! दुसऱ्या दिवसअखेर भारताच्या 5 बाद 183 धावा

कर्णधार विराट कोहलीने फटकावलेल्या चिवट अर्धशतकाच्या जोरावर सेंच्युरियन कसोटीत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेच्या 335 धावांना प्रत्युत्तर देताना दुसऱ्या दिवसअखेर 5 बाद 183 धावांपर्यंत मजल मारली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2018 9:19 PM

Open in App

सेंच्युरियन पार्क - दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील भारतीय फलंदाजांची निराशाजनक कामगिरी रविवारीही कायम राहिली. मात्र कर्णधार विराट कोहलीने फटकावलेल्या चिवट अर्धशतकाच्या जोरावर सेंच्युरियन कसोटीत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेच्या 335 धावांना प्रत्युत्तर देताना दुसऱ्या दिवसअखेर 5 बाद 183 धावांपर्यंत मजल मारली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विराट कोहली 85 आणि हार्दिक पांड्या 11 धावांवर खेळत होते.दक्षिण आफ्रिकेच्या 335 धावांना प्रत्युत्तर देण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाने सावध सुरुवात केली. मात्र लोकेश राहुल (10) आणि चेतेश्वर पुजारा (0) हे पाठोपाठ माघारी परतल्याने भारताची अवस्था 2 बाद 28 अशी झाली. त्यानंतर मुरली विजय आणि कर्णधार विराट कोहलीने 79 धावांची भागीदारी करत भारताचा डाव सावरला. मात्र मुरली विजय 46 धावा काढून केशव महाराजची शिकार झाल्यावर भारताच्या डावाला पुन्हा गळती लागली. विजयपाठोपाठ रोहित शर्मा 10 आणि पार्थिव पटेल 19 धावांवर बाद झाले. त्यानंतर मात्र विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने अधिक पडझड होऊ न देता खेळ संपेपर्यंत संघाचा डाव सावरून धरला. भारतीय संघ अद्यापही 152 धावांनी पिछाडीवर असून, खेळपट्टीवर असलेल्या विराट कोहलीवर संघाची मदार आहे. तत्पूर्वी,  रवीचंद्रन अश्विन आणि इशांत शर्मा यांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 335 धावांवर आटोपला. भारताकडून रवीचंद्रन अश्विनने चार तर इशांत शर्माने 3 बळी टिपून यजमान संघाला   मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. दक्षिण आफ्रिकेच्या डावात हाशिम आमला (82) व मार्कराम (94) यांनी उल्लेखनीय योगदान दिले.   दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दिवशीच्या 6 बाद 269 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केल्यावर यजमानांचे तळाचे फलंदाज फार चमक दाखवू शकले नाहीत. शमीने केशव महाराज (18) ची विकेट काढत दक्षिण आफ्रिकेला सातवा धक्का दिला. त्यानंतर एक बाजू लावून धरणाऱ्या कर्णधार फाफ डू प्लेसिसने कागिसो रबाडासोबत 42 धावांची भागीदारी करत दक्षिण आफ्रिलेला तीनशेपार पोहोचवले. या दरम्यान भारतीय क्षेत्ररक्षकांनीही गचाळ क्षेत्ररक्षण करत अनेक झेल सोडले त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा डाव लांबण्यास मदत झाली. अखेर इशांत शर्माने कागिसो रबाडा (11) आणि  डू प्लेसिस (63) यांना माघारी धाडले. तर अश्विनने डावातील चौथा बळी मिळवत दक्षिण आफ्रिकेचा डाव 335 धावांवर संपुष्टात आणला. 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघविराट कोहलीभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८