मतीन खान, स्पोर्ट्स हेड, सहायक उपाध्यक्ष, लोकमत पत्रसमूह
९ फेब्रवारीपासून बॉर्डर-गावसकर मालिकेची सुरुवात नागपूर कसोटीने होईल. या संपूर्ण मालिकेत विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि लोकेश राहुल यांच्यापैकी एकाला भारतासाठी ‘हेरी व्हेरी स्पेशल’ कामगिरी करावी लागेल. तेव्हाच कुठे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत दिमाखात प्रवेश करू शकेल.
भारताचा कसोटीमधील मधल्या फळीतला दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणला (वेंगी पुरपू वेंकट साई लक्ष्मण) क्रिकेटमध्ये व्हेरी व्हेरी स्पेशल म्हटले जाते. एमएल जयसिम्हा आणि मोहम्मद अझरुद्दीन यांच्यानंतर मनगटाच्या साहाय्याने सर्वांगसुंदर फलंदाजी करणारा फलंदाज म्हणजे व्हीव्हीएस लक्ष्मण. याच मनगटाच्या जोरावर लक्ष्मणने भारताला अनेक कसोटी सामने एकहाती जिंकून दिले. हा तोच खेळाडू होता ज्याने 
जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाच्या नाकात दम करून ठेवला होता. आपल्या संपूर्ण कसोटी कारकिर्दीत लक्ष्मण 
बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक यशस्वी ठरला. 
ऐतिहासिक कोलकाता कसोटीला आपण कसे विसरू शकतो. त्या सामन्यात लक्ष्मणने राहुल द्रविडच्या साथीने ३७६ धावांची मॅरेथॉन भागीदारी केली होती. त्यावेळची भारताकडून २८१ धावांची सर्वाधिक मोठी वैयक्तिक धावसंख्या उभारत लक्ष्मणने फॉलोऑन मिळालेला सामना भारताच्या बाजूने झुकवला आणि ऐतिहासिक विजयही बनवून दिला. तब्बल १७१ धावांनी कांगारूंनी तो सामना गमावला होता. उसे ही याद किया जाएगा इस जमाने में अंधेरी रात में जो भी दीया जलाएगा
ऑस्ट्रेलिया विरुद्ध लक्ष्मण (कसोटीत)
- सामने - २९
- विजय - ०९ (०७ भारतात, ०२ ऑस्ट्रेलियात)
- पराभव - १४ (०४ भारतात, १० ऑस्ट्रेलियात)
- अनिर्णित - ०६
- ९ जिंकलेल्या सामन्यांमध्ये लक्ष्मणने ८ अर्धशतके झळकावली होती.
- २ शतके ठोकली ज्यामध्ये २८१ धावांच्या ऐतिहासिक खेळीचाही समावेश आहे.
लक्ष्मणच्या खेळीची एक खासियत असायची. तो कसोटीमध्ये वेगाने धावा काढायचा. दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून गॅप शोधत लक्ष्मण सहज चौकारांचा वर्षांव करत असे. कोलकाता कसोटीत २८१ धावा त्याने ४५२ चेंडूंत काढल्या. ज्यामध्ये ४४ चौकारांचा समावेश होता. त्याचा स्ट्राइक रेट ६२च्या जवळपास होता. ग्लेन मॅक्ग्रा, जेसन गिलेस्पी, मायकल कॅस्प्रोविच, आणि शेन वॉर्न यांच्यासारख्या एकापेक्षा एक सरस गोलंदाजांसमोर त्याने ही धावसंख्या उभारली होती, हे विशेष. या कसोटीत परिस्थिती अशी आली होती की कर्णधार स्टीव्ह वॉला दुसऱ्या डावात ९ गोलंदाजांकडून गोलंदाजी करून घ्यावी लागली होती. 
ऑस्ट्रेलियाविरुद्ध लक्ष्मणचे एकूण विक्रम
सामने - २९
धावा - २४३४
सर्वाधिक - २८१ 
सरासरी - ४९.६७
शतके - ६
अर्धशतके - १२
झेल - ३६