महिलांचे IPL म्हणून ओळखली जाणारी महिला प्रीमियर लीग (WPL) स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. मुंबई इंडियन्स (MI), युपी वॉरियर्स (UPW), गुजरात जायंट्स (GG) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात दुसऱ्या स्थानासाठी स्पर्धा सुरू आहे. चालू हंगामाचा अंतिम सामना ५ फेब्रुवारीला कोटाम्बी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. याचदरम्यान, विराट कोहलीचा (Virat Kohli) जुना सहकारी चर्चेत आला आहे. विराटने त्याच्यासोबत एकेकाळी विश्वचषक उंचावला होता. पण आता तो सहकारी चक्क पंच म्हणून काम पाहतोय. जाणून घेऊया त्याच्याबद्दल... (Ajitesh Argal)
कोण आहे हा सहकारी?
महिला प्रीमियर लीगच्या चालू हंगामात अजितेश अर्गल पंच म्हणून काम करत आहेत. २२ जानेवारी रोजी गुजरात जायंट्स आणि UP वॉरियर्स यांच्यातील सामन्यात त्यांनी मैदानावर पंच म्हणून काम पाहिले. त्यानंतर २४ जानेवारीला RCB आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यात त्यांनी पंच म्हणून काम पाहिले. अजितेश हा एक प्रसिद्ध क्रिकेटपटू आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताच्या २००८च्या अंडर-१९ विश्वचषक विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. मलेशियातील क्वालालंपूर येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने DLS पद्धतीने दक्षिण आफ्रिकेचा १२ धावांनी पराभव केला. अजितेश अर्गलने अंतिम सामन्यात शानदार गोलंदाजी केली होती आणि दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या होत्या. त्याला उत्कृष्ट कामगिरीसाठी सामनावीर म्हणूनही गौरवण्यात आले होते.
भारतीय संघातही नाही, IPL मध्येही नाही...
अंडर-१९ वर्ल्ड कप फायनलनंतर असे मानले जात होते की हा वेगवान गोलंदाज लवकरच भारतीय वरिष्ठ संघात समाविष्ट होईल, परंतु तसे झाले नाही. अजितेशची क्रिकेट कारकीर्द यशस्वी झाली नाही. तो कधीही भारतीय वरिष्ठ संघाकडून खेळला नाही. २००८ च्या अंडर-१९ विश्वचषकानंतर, अजितेश अर्गलला किंग्ज इलेव्हन पंजाब (आता पंजाब किंग्ज) ने करारबद्ध केले होते. पण त्याला इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर, अजितेशने बडोद्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळले. त्याच्या कारकिर्दीत त्याने १० प्रथम श्रेणी सामने, ६ टी२० सामने आणि ३ लिस्ट ए सामने खेळले आणि एकूण २९ विकेट्स घेतल्या.
शेवटचा सामना कधी?
अजितेश अर्गलचा शेवटचा प्रथम श्रेणी सामना २०१५ मध्ये मध्य प्रदेशविरुद्ध होता. ३७ वर्षीय अजितेश अर्गलने खूप पूर्वी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. अजितेश आयकर अधिकारी म्हणून कार्यरत आहे. त्याने २०२३ मध्ये अंपायरिंग परीक्षा देखील उत्तीर्ण केली. अजितेश अर्गलने तीन प्रथम श्रेणी सामने, नऊ लिस्ट ए सामने आणि २१ टी-२० सामन्यांमध्ये मैदानी पंच म्हणून काम केले आहे. त्यांनी एक लिस्ट ए सामना आणि तीन टी-२० सामन्यांमध्ये टीव्ही पंच म्हणूनही काम केले आहे. क्रिकेटपटू म्हणून त्यांची कारकीर्द अपूर्ण असली तरी, खेळाशी त्यांचे नाते अबाधित आहे.