Join us

VIDEO: 'संस्कारी' विराट! शमीच्या आईच्या पाया पडला, आशीर्वाद घेतले अन् फोटोही काढला...

Virat Kohli Mohammad Shami mother viral video: मोहम्मद शमीच्या आई मैदानावर साऱ्यांचे कौतुक करण्यासाठी आली होती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 15:37 IST

Open in App

Virat Kohli Mohammad Shami mother viral video: भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडला पराभूत करून चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद ( Champions Trophy Final ) जिंकले. रविवारी झालेल्या Champions Trophy 2025 फायनलच्या सामन्यात न्यूझीलंडविरूद्ध ( IND vs NZ ) भारताने ४ गडी आणि ६ चेंडू राखून विजय मिळवला. न्यूझीलंडने ( New Zealand ) डॅरेल मिचेल (६३) आणि मायकल ब्रेसवेल (नाबाद ५३) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ५० षटकांत ७ बाद २५१ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मा (७६), श्रेयस अय्यर (४८) आणि केएल राहुल (नाबाद ३४) या तिघांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या विजयानंतर भारतीय संघाच्या खेळाडूंचे कुटुंबीय मैदानात आले होते. त्यावेळी विराट कोहलीने संस्कारांची जाण ठेवत, मोहम्मद शमीच्या आईचे आशीर्वाद घेतले. हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे.

भारताला शेवटच्या काही षटकात मोजक्याच धावा हव्या होत्या. रवींद्र जाडेजाने चौकार मारून भारताला 'चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन' बनवले. सामना जिंकल्यानंतर अनेक खेळाडूंचे कुटुंबीय मैदानात आले. त्यातच मोहम्मद शमीची आई आणि काही कुटुंबीयदेखील आले होते. शमी विराटला आपल्या आईला आणि कुटुंबीयांना भेटायला घेऊन गेला, त्यावेळी संस्कार लक्षात ठेवत विराट सर्वात आधी शमीच्या आईच्या पाया पडला, त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांच्याशी अतिशय मनमोकळा संवाद साधला आणि अखेरीस शमीच्या कुटुंबीयांसोबत विराटने छान पोज देत फोटोदेखील काढला. विराटची ही कृती साऱ्यांनाच आवडली. सारे चाहते विराटच्या या कृतीचे तोंडभरून कौतुक करत आहेत. हा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफी तीन वेळा जिंकणारा भारत हा जगातील पहिला संघ ठरला आहे. २००२ साली भारताला ही ट्रॉफी विभागून घ्यावी लागली. २०१३ साली भारताने इंग्लंडला हरवून विजेतेपद पटकावले. तर २०२५ मध्ये न्यूझीलंडला पराभूत करत भारताने विजय मिळवला. याशिवाय, ICCच्या सलग दोन स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवण्याची किमया साधणाराही भारत हा एकमेव देश ठरला. भारताने २०२४ मध्ये टी२० वर्ल्डकप जिंकला. पाठोपाठ रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले.

टॅग्स :चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५विराट कोहलीभारत विरुद्ध न्यूझीलंडमोहम्मद शामीव्हायरल व्हिडिओभारतीय क्रिकेट संघ