भारताचा जेष्ठ क्रिकेटपटू विराट कोहली हा गेल्या काही महिन्यांपासून जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत आपल्या बॅटचा इंगा दाखवल्यानंतर सध्या विराट देशांतर्गत क्रिकेटमध्ये विजय हजारे करंडक स्पर्धेत धडाकेबाज खेळी करत आहे. आता विराट कोहलीविजय हजारे करंडक स्पर्धेत आपला तिसरा सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. ६ जानेवारी रोजी बंगळुरूमध्ये होणाऱ्या दिल्ली आणि रेल्वे यांच्यातील लढतीत तो खेळणार आहे. दिल्ली क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहन जेटली यांनी विराट कोहलीच्या खेळण्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. विराट कोहली याने विजय हजारे करंडक स्पर्धेतील तीन सामन्यांसाठी आपण उपलब्ध असल्याचे कळवले आहे.
दरम्यान, विजय हजारे करंडक स्पर्धेतील ज्या २ सामन्यात विराट कोहली खेळला होता. त्या दोन्ही सामन्यांत त्याने जबरदस्त कामगिरी करताना अनुक्रमे १३१ आमि ७७ धावांच्या खेळी केल्या होत्या. त्याबरोबरच विराटने लिस्ट ए क्रिकेटमध्ये १६ हजार धावाही पूर्ण केल्या. यादरम्यान, सर्वात जलद हा टप्पा ओलांडणाऱ्यांच्या यादीत त्याने सचिन तेंडुलकरला मागे टाकले.
त्याआधी विराट कोहली याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेही जबरदस्त कामगिरी केली होती. विराट कोहलीने त्या मालिकेत सलग दोन शतके ठोकली होती. तसेच एक अर्धशतकी खेळीही केली होती. त्यामुळे भारताला ही मालिका २-१ अशा फरकाने जिंकण्यात यश मिळाले होते.
आता न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेपूर्वी भारतीय संघ ८ जानेवारी रोजी बडोदा येथे एकत्र येईल. तसेच विराट कोहली तिथे एक दिवस आधीच पोहोचून सरावाला सुरुवात करण्याची शक्यता आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेला ११ जानेवारीपासून सुरुवात होणार असून, या मालिकेतील पहिला सामना हा ११ जानेवारी रोजी खेळला जाणार आहे. दरम्यान, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांनी या मालिकेमधून माघार घेतल्याचे वृत्त आहे.