Virat Kohli, Ranji Trophy : १२ वर्षांनंतर रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण करीत असलेल्या विराट कोहलीने मंगळवारी दिल्ली संघासोबत सराव केला. ३६ वर्षांचा विराट ३० जानेवारीपासून रेल्वेविरुद्ध रणनी सामना खेळणार आहे. २०१२ ला त्याने गाझियाबाद येथे उत्तर प्रदेशविरुद्ध अखेरचा रणजी सामना खेळला होता. विराट सकाळी ९ वाजता अरुण जेटली स्टेडियममध्ये दाखल झाला. सहकाऱ्यांची भेट घेत वॉर्मअप करीत १५ मिनिटे फुटबॉल खेळण्याचा त्याने आनंद घेतला. दिल्ली संघातील तीन खेळाडू प्रथमच कोहलीसोबत ड्रेसिंग रूममध्ये असतील. मुख्य कोच सरनदीपसिंग यांच्या मार्गदर्शनात हा सराव पार पडला. त्यानंतर त्याने आपल्या बालमित्राची आणि त्याचा मुलगा कबीर याची भेट घेतली.
कबीरचा विराटला क्रिकेटबद्दल खास प्रश्न
चौथ्या वर्गाचा विद्यार्थी कबीर पुढे आला. त्याने विराटला 'अंकल' संबोधून स्वतः काढलेले स्केच विराटकडे सोपविले. कोहली हा कबीरचे वडील शावेज याच्यासोबत दिल्लीच्या १७ आणि १९ वर्षाखालील संघातून खेळला आहे. विराटशी काय बोलणं झालं याबाबत कबीरने नंतर सांगितले. तो म्हणाला, "मी त्यांना विचारले की भारताकडून कसा खेळू शकेन? तर विराटने मला सांगितले की, तू कठोर मेहनत घे, मला सरावाला जायचे आहे, असे वारंवार वडिलांना सांग. दिल्लीवाले हो, दम दिखाओ. सकारात्मक खेलो जैसे दिल्लीवाले खेलते है.!"
----
लंचमध्ये 'कढी-चावल'
दिल्लीत विराटला 'चिकू' नावाने संबोधले जाते. त्याने तीन तास सरावात घाम गाळला. यावेळी सरनदीप आणि फलंदाजी कोच मिंटूसिंग हे कोहलीच्या सभोवताल होते. कोहलीने मात्र १९ वर्षाखालील संघाचे कोच राहिलेले महेश भाटी यांच्यासोबत बराचवेळ संवाद साधला. यावेळी डीडीसीएच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने प्रतिक्रिया दिली की विराट बदलला नाही. त्याला छोलेपुरी आवडते. आम्ही त्याच्यासाठी ती व्यवस्था केली. मात्र सरावानंतर त्याने छोलेपुरी खाणे टाळले, पण दुसरा आवडता पदार्थ असलेल्या 'कढी-चावल'चा सर्व सहकाऱ्यांसह आनंद घेतला.
संघाचे नेतृत्व करण्यास विराट कोहलीचा नकार
दीर्घकाळानंतर रणजी सामना खेळणार असल्याने विराट कोहलीने रेल्वेविरुद्ध दिल्ली संघाचे नेतृत्व करण्यास नम्रपणे नकार दिला. सत्रातील अखेरच्या सामन्यात नेतृत्व आयुष बडोनी याच्याकडेच असावे असे विराटला वाटते. कर्णधारपद सांभाळणार का? अशी डीडीसीएने विराटला विचारणा केली होती. जियो सिनेमाने या सामन्याचे लाइव्ह स्ट्रिमिंग करण्याची तयारी दर्शविली आहे. त्याचवेळी दिल्ली- रेल्वे आणि ईडनवरील बंगाल- पंजाब या सामन्यावे लाइव्ह स्ट्रिमिंग केले जाईल. देशभरातील विराटच्या चाहत्यांना आपल्या पसंतीच्या खेळाडूला लाइव्ह पाहता येणार आहे.