Virat Kohli Bharat Ratna: टीम इंडियाची 'रनमशिन' धडाकेबाज फलंदाज विराट कोहली याने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. टी२० आणि कसोटी क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर विराट केवळ वनडे क्रिकेट खेळत राहणार आहे. विराट कोहलीने निवृत्तीबद्दल बीसीसीआयला आधीच कळवल्याची माहिती होती. बीसीसीआयने त्याला आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंतीही केली होती. पण अखेर आपल्या निर्णयावर ठाम राहत विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. विराटने कसोटी क्रिकेटला नवसंजीवनी दिली होती. विराटमुळे गेल्या दशकात निरस वाटणारे कसोटी क्रिकेट पुन्हा रोमांचक बनले. क्रिकेटच्या या सर्वात जुन्या फॉरमॅटला जिवंत ठेवल्याबद्दल विराटचे सर्वत्र कौतुक झाले. त्यातच आता भारताचा माजी फलंदाज सुरेश रैना (Suresh Raina) याने विराट कोहलीला भारतरत्न देण्याची मागणी केली आहे.
विराट कोहलीला भारत सरकारकडून अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. २०१३ साली त्याला अर्जुन पुरस्कार देण्यात आला. २०१७ साली त्याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर २०१८ साली विराटला क्रीडा जगतातील भारताचा सर्वोच्च सन्मान असलेला खेलरत्न पुरस्कारही प्रदान करण्यात आला. विराटने क्रिकेट या खेळासाठी दिलेल्या अमूल्य योगदानासाठी त्याला आणखी मोठा सन्मान मिळायला हवा. विराट कोहलीने भारताला जगात नवी ओळख मिळवून दिली. त्यामुळे विराटच्या योगदानासाठी त्याला भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवले जायला हवे, असे मत सुरेश रैनाने व्यक्त केले.
ऑपरेशन सिंदूरनंतर थांबवण्यात आलेली IPL 2025 स्पर्धा १७ मे पासून पुन्हा सुरू झाली. सुधारित वेळापत्रकानुसार, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात चिन्नास्वामीच्या मैदानावर लढत रंगणार होती. बंगळुरुच्या मैदानात पावसाने हजेरी लावल्यामुळे चाहत्यांची विराटचा खेळ पाहण्याची संधी हुकली. पण चाहते अगदी वेळेत अन् ठरल्याप्रमाणे विराट कोहलीला खास सलाम देण्यासाठी स्टेडियमवर जमा झाले. सामन्याआधी विराट कोहलीला खास मानवंदना देण्यात आली. सोशल मीडियावर एक खास मोहिम राबवण्यात आली होती. कोहलीला खास अंदाजात फेअरवेल देण्यासाठी चाहत्यांनी व्हाइट जर्सी घालून स्टेडियमवर जमण्याची विनंती करण्यात आली होती. ही मोहिम फत्ते झाल्याचे चित्र RCB vs KKR यांच्यातील सामन्याआधी पाहायला मिळाले. बच्चे कंपनीसह सारेच मोठ्या संख्येने बंगळुरुच्या स्टेडियमवर १८ नंबरची व्हाइट जर्सी घालून पोहोचले.