Join us  

विराट कोहलीसह चार भारतीय Asia XI vs World XI Match खेळणार; पाकिस्तानी खेळाडूही सोबत दिसणार?

शेख मुजीबूर रहमान यांच्या 100व्या स्मृतिदिनानिमित्त बांगलादेश क्रिकेट मंडळ ( बीसीबी) Asia XI vs World XI यांच्यात दोन ट्वेंटी-20 सामन्यांच्या आयोजन करणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 10:17 AM

Open in App
ठळक मुद्दे18 आणि 21 मार्चला ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर ट्वेंटी-20 सामने खेळवण्यात येणार आहेआशिया एकादश संघात भारतासह यजमान बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तान संघाच्या खेळाडूंचाही समावेश असणार आहे.

शेख मुजीबूर रहमान यांच्या 100व्या स्मृतिदिनानिमित्त बांगलादेश क्रिकेट मंडळ ( बीसीबी) Asia XI vs World XI यांच्यात दोन ट्वेंटी-20 सामन्यांच्या आयोजन करणार आहे. बांगलादेशचे राष्ट्रपिता म्हणून शेख मुजीबूर रहमान ओळखले जातात. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त 18 आणि 21 मार्चला ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर ट्वेंटी-20 सामने खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आशिया एकादश संघाचे प्रतिनिधित्व करताना पाकिस्तानी खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावून खेळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या सामन्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी कोहलीसह मोहम्मद शमी, शिखर धवन आणि कुलदीप यादव या चार भारतीय खेळाडूंची नावं पाठवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ''कोणते खेळाडू उपलब्ध असतील याची चाचपणी पाहून गांगुलीनं बीसीबीकडे चार खेळाडूंची नावं पाठवली आहेत. त्यानुसार कोहली, शमी, धवन आणि कुलदीप हे आशिया एकादश संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. आशिया एकादश संघ ठरवण्यासाठी बांगलादेश क्रिकेट मंडळानं बीसीसीआयकडून यादी मागवली होती,'' अशी माहिती सूत्रांनी दिली.

आशिया एकादश संघात भारतासह यजमान बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तान संघाच्या खेळाडूंचाही समावेश असणार आहे. त्यामुळे कोहली पाकिस्तानी खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावून खेळताना दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. पण, अद्याप तरी पाकिस्तानी खेळाडूंच्या समावेशाबद्दल अनिश्चितता आहे. दरम्यान, बीसीसीआयचे सरचिटणीस जयेश जॉर्ज यांनी या सामन्यासाठी पाकिस्तानी खेळाडूंना बोलावण्यात येणार नाही, याची खात्री केली आहे. ''आशिया एकादश संघात पाकिस्ताीन खेळाडू नसतील, याची खातरजमा आम्ही केली आहे. दोन्ही देश कोणत्याही निमित्तानं एकत्र येणार नाहीत,''असे जयेश यांनी सांगितले.  

पाकिस्तान क्रिकेट मंडळानं ( पीसीबी) त्यांच्या खेळाडूंच्या व्यग्र वेळापत्रकामुळे या सामन्यात ते खेळणार नसल्याचे सांगितले आहे. ''जागतिक एकादश आणि आशिया एकादश यांच्यातले ट्वेंटी-20 सामने 16 ते 20 मार्च या कालावधीत होणार आहेत. या दरम्यान पाकिस्तान सूपर लीगही आहे आणि त्याचा अंतिम सामना 22 मार्चला होणार आहे. त्यामुळे दोन्ही स्पर्धांच्या तारखा बदलणे शक्य नाही. त्यामुळे आमचे खेळाडू खेळणार नसल्याचे आम्ही बीसीबीला कळवले आहे. त्यांनी आमची अडचण समजून घेतली आहे,'' असे पीसीबीच्या प्रवक्त्यांनी सांगितले. 

टॅग्स :विराट कोहलीभारतीय क्रिकेट संघबांगलादेशश्रीलंकापाकिस्तानमोहम्मद शामीकुलदीप यादवशिखर धवनबीसीसीआयसौरभ गांगुली