भारतीय संघाचा सुपरस्टार विराट कोहली ( Virat Kohli) मागील दोन-अडीच वर्षांपासून फॉर्माशी झगडतोय. चाहते त्याच्या ७१व्या आंतरराष्ट्रीय शतकाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. पण, विराटची सततची विश्रांती ही चाहत्यांचे टेंशन वाढवणारी आहे. पण, विराटने आता मोठा दावा केला आहे. आगामी आशिया चषक ( Asia Cup T20) स्पर्धेतून तो पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. ही स्पर्धा श्रीलंकेत होणार होती, परंतु तेथील अराजकीय परिस्थिती लक्षात घेता आता UAE येथे आशिया चषक होणार आहे. बीसीसआय अध्यक्ष सौरव गांगुलीने तशी घोषणा केली आहे.
आशिया चषक स्पर्धेच्या ५० व २० षटकांच्या स्पर्धेत टीम इंडिया गतविजेता आहे आणि यावर्षी त्यांना ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी आशिया चषक महत्त्वाची आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिज दौऱ्यावर विश्रांती घेतली आहे. त्याने झिम्बाब्वे दौऱ्यावर खेळावे, ही बीसीसीआयची इच्छा आहे. सध्या विराट पॅरीसमध्ये पत्नी अनुष्का शर्मा व मुलगी वामिकासह सुट्टीवर आहे. ३३ वर्षीय विराटने इंग्लंड दौऱ्यावर ७६ धावाच केल्या. आशिया चषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट सहाव्या क्रमांकावर आहे. २०१८च्या आशिया चषक स्पर्धेत विराट खेळू शकला नव्हता आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने ती स्पर्धा जिंकली होती.
आता विराट कोहली आशिया चषक स्पर्धेत पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपाठापाठ पुढील वर्षी भारतात वन डे वर्ल्ड कप होणार आहे. त्याबाबत विराटने मोठे भाष्य केले आहे. तो म्हणाला,''भारताला आशिया चषक आणि वर्ल्ड कप जिंकून देण्याचे माझे ध्येय आहे आणि त्यासाठी माझी काहीही करण्याची तयारी आहे.''
विराटच्या या निर्धाराने पाकिस्तानचे टेंशन वाढले आहे. आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानला दोन वेळा भारताचा सामना करावा लागेल, त्याशिवाय ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यातच भारत-पाकिस्तान भिडणार आहेत. मागील वर्ल्ड कप स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी भारतीय खेळाडूंनी कंबर कसली आहे.