Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय संघ वर्ल्ड कप जेतेपदाचा दावेदार नाही, विराट कोहलीची कबुली 

इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 18:11 IST

Open in App

नवी दिल्ली : इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. मात्र, संघाचा कर्णधार विराट कोहलीला असे वाटत नाही. वर्ल्ड कप स्पर्धेत कुणी एक फेव्हरिट नाही, सर्वच संघ या शर्यतीत ताकदीनं उतरतात, त्यामुळे भारत हा एकटा दावेदार नाही, असे मत कोहलीनं व्यक्त केलं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारताला घरच्या प्रेक्षकांसमोर 3-2 असा पराभव पत्करावा लागला. तरीही भारतीय संघ वर्ल्ड कपमध्ये सर्वोत्तम कामगिरी करेल असा विश्वास कोहलीनं व्यक्त केला.

आयसीसीच्या जागतिक क्रमवारीत भारत आणि इंग्लंड अनुक्रमे दुसऱ्या व पहिल्या स्थानावर आहेत. पण, अॅरोन फिंचच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वीच भारतीय संघाला पराभवाचे पाणी पाजले. डेव्हिड वॉर्नर आणि स्टिव्हन स्मिथ यांच्या पुनरागमनानंतर ऑस्ट्रेलियाची ताकद आणखी वाढणार आहे.

''प्रामाणिकपणे सांगायचे तर वर्ल्ड कपमध्ये प्रत्येक संघ जेतेपदाचा दावेदार आहे. प्रत्येक संघ वर्ल्ड कप जिंकण्याच्या निर्धारानेच मैदानावर उतरणार आहे. त्यामुळे जो संघ ज्या दिवशी सर्वोत्तम खेळेल, तो बाजी मारेल,'' असे कोहली म्हणाला.ऑस्ट्रेलियानेही मालिका जिंकून आपली दावेदारी सिद्ध केली आहे आणि न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांनीही दमदार कामगिरी केली आहे. ''वर्ल्ड कप स्पर्धेत एखादा संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार असू शकत नाही. त्यामुळे कोणताही संघ धोकादायक ठरू शकतो. वेस्ट इंडिजची सध्याची कामगिरी आपण पाहिलीच आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत ते कडवे आव्हान उभे करू शकतात. इंग्लंडचा संघही मजबूत आहे आणि ऑस्ट्रेलियाने विश्वास कमावला आहे. न्यूझीलंड, पाकिस्तान हे संघही कोणालाही नमवण्याची क्षमता राखतात,''असे कोहली म्हणाला. 

टॅग्स :विराट कोहलीआयसीसीआयसीसी विश्वकप २०१९