Join us

‘टेस्ट टीम ऑफ द इयर’मध्ये विराट कोहलीचा समावेश नाही

शानदार सरासरी असतानाही वगळल्याने आश्चर्य.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 10:12 IST

Open in App

दुबई : ‘टेस्ट टीम ऑफ द इयर-२०२३‘मध्ये भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याचा समावेश नसल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाण याने देखील याबाबत आश्चर्य व्यक्त केले. शानदार सरासरी असतानाही विराट याला यंदाच्या वर्षीच्या कसोटी संघात स्थान मिळालेले नाही. 

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान कसोटी मालिकेला सेंच्युरियन मैदानावर सुरुवात झालेली आहे. यादरम्यान स्टार स्पोर्ट्सवर २०२३ या वर्षीचा कसोटी संघ दाखविण्यात आला. या कसोटी संघात भारताचा सलामीवीर आणि कर्णधार रोहित शर्माला स्थान देण्यात आले आहे. पण, संपूर्ण संघात रन मशीन कोहलीच्या नावाचा उल्लेख नाही. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून जो रूटचा समावेश करण्यात आला आहे. यावर्षी विराट कोहली शानदार फाॅर्ममध्ये आहे. मात्र, तरीही टेस्ट टीम ऑफ द इयरमध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरला आहे. 

भारताच्या तीन खेळाडूंचा समावेश

टेस्ट टीम ऑफ द इयरमध्ये तज्ज्ञांनी तीन भारतीय खेळाडूंचा समावेश केला आहे. सलामीवीर म्हणून ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा, रोहित शर्मा यांचा समावेश आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांना निवडण्यात आले आहे. या फिरकी जोडीला चांगला अनुभव असून, सध्या ते दक्षिण आफ्रिकेत भारताकडून खेळत आहेत. सेंच्युरियन येथील पहिल्या कसोटीआधीच जडेजाला दुखापत झाल्यामुळे त्याला भारतीय संघात स्थान मिळू शकले नाही.

टेस्ट टीम ऑफ द इयर-२०२३ पुढीलप्रमाणे : उस्मान ख्वाजा, रोहित शर्मा, जो रूट, केन विलियमसन, ट्रॅव्हिस हेड, जॉनी बेअरस्टो, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, स्टुअर्ट ब्रॉड.

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघविराट कोहली